जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये सोमवारी (दि. १७ नोव्हेंबर) दुपारी एक धक्कादायक घटना घडली. मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने अंदाजे ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, तरुणाने उडी मारून आत्महत्या केली की हा अपघात आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे व्यापारी आणि नागरिकांची मोठी वर्दळ सुरू होती. याचदरम्यान एका तरुणाचा मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याचा प्रकार घडला. उंचावरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मार्केटमधील व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करून गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे नाव व पत्ता शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तो गोलाणी मार्केटमध्ये कोणत्या कारणाने आला होता, तसेच चौथ्या मजल्यावरून खाली पडण्यामागील नेमके कारण काय, याचा तपास केला जात आहे. या घटनेचे गूढ उकलण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येत आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, नंदू पाटील आणि राहुल पांचाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांच्या पुढील तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.



