जळगावात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक; शायना एनसी यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन!

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा आरोप; स्मारकस्थळी जाऊन माफी मागण्याची मागणी, अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी) : स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने जळगावात शायना एनसी यांच्याविरोधात आक्रमक आंदोलन केले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसेच काळी शाई फासून तीव्र निषेध व्यक्त केला.

या आंदोलनादरम्यान महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शायना एनसी यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकस्थळी जाऊन नाक घासून जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली. तसेच शिंदे गटाने शायना एनसी यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्या महिलांनी मांडली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि प्रतिमेचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका महिला कार्यकर्त्यांनी यावेळी घेतली. शायना एनसी यांनी माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर मार्गाने गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असा इशाराही महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.

या आंदोलनामुळे जळगावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ठाकरे गटाच्या महिला आघाडीने या प्रकरणी आपला तीव्र विरोध आणि नाराजी व्यक्त करत शायना एनसी यांच्याविरोधातील आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.