भुसावळ विभागात जागतिक पर्यावरण दिन 2026


भुसावळ (प्रतिनिधी) –

जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2026 निमित्त आज दिनांक 20.05.2026 रोजी भुसावळ विभागात विविध रेल्वे स्थानके, रेल्वे वसाहती तसेच कार्यालयीन परिसरांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संरक्षणासंदर्भात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

याच अनुषंगाने विभागातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांना प्लॅटफॉर्मवरील कचरा वर्गीकरण (Waste Segregation) याचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्रवाशांना कचरापेट्यांचा योग्य वापर, जैविक व पर्यावरणपूरक कटलरीचा वापर वाढविणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा (Single Use Plastic) वापर कमी करणे तसेच जैविक कचऱ्याचे शास्त्रीय व सुरक्षित व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनाही योग्य कचरा वर्गीकरण, स्वच्छता मानकांचे पालन आणि पर्यावरण संरक्षणासाठी अवलंबावयाच्या विविध उपाययोजनांबाबत संवेदनशील करण्यात आले.

या प्रसंगी मंडळातील विविध रेल्वे स्थानके व रेल्वे वसाहतींमध्ये व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता उपक्रम पार पडले आणि स्वच्छ व हरित पर्यावरणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित रेल्वे कर्मचारी व नागरिकांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छतेचा अंगीकार तसेच अधिकाधिक वृक्षारोपण करण्यासाठी प्रेरित करण्यात आले.

भुसावळ मंडळामार्फत जागतिक पर्यावरण दिन 2026 अंतर्गत आगामी काळातही विविध जनजागृती कार्यक्रम, स्वच्छता मोहीम व लोकसहभागावर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.