भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अमृत टप्पा-२ पाणीपुरवठा योजनेचे काम निर्धारित मुदत संपूनही अपूर्ण असल्याने संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) समाविष्ट करावे, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, अमृत टप्पा-२ योजनेचे काम एडके व विलास पाटील असोसिएट या ठेकेदारांकडे सोपविण्यात आले आहे. या कामाची निर्धारित मुदत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. मात्र, मुदत संपूनही योजनेचे ५० टक्के कामदेखील पूर्ण झालेले नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. भुसावळ शहर व परिसरातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ही योजना प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे योजनेचे काम रखडले असून त्याचा नाहक त्रास भुसावळकर नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे सानप यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच ठेकेदारांच्या आर्थिक स्वार्थामुळे जाणीवपूर्वक काम रखडविले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. **ठेकेदारांकडून काम काढून घेऊन दंडात्मक कारवाई करा** अमृत टप्पा-२ योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण न करणाऱ्या संबंधित ठेकेदारांकडून काम काढून घेण्यात यावे. तसेच नियमांनुसार दंडात्मक कारवाई करून संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण योजनेतील विलंबाबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.



