जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसमारंभाला रक्तरंजित वळण लागल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. लग्नाचा आनंदोत्सव सुरू असतानाच किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत २३ वर्षीय प्रेम गोपाल धनगर या तरुणाची धारदार चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे बोरनारसह परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी बोरनार येथे लग्नसमारंभ सुरू असताना प्रेम धनगर याचा काही जणांशी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. दरम्यान, अज्ञात हल्लेखोराने धारदार चाकूने प्रेम याच्यावर सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपासाची कार्यवाही सुरू केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली? वादात सहभागी असलेले संशयित कोण आहेत? हल्लेखोरांनी पूर्वनियोजित कटातून हा हल्ला केला की अचानक झालेल्या वादातून हत्या घडली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्यात येत असून हत्येमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे. लग्नसोहळ्यातील आनंदाचे क्षण क्षणार्धात शोकात बदलल्याने बोरनार परिसर सुन्न झाला आहे. अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत असून एमआयडीसी पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



