भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमियमजवळ सार्वजनिक ठिकाणी सट्टा बंद असतानाही अवैधरित्या सट्टा स्वीकारत असलेल्या दोन इसमांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी २२४० रुपये रोख रक्कम व सट्टा जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

शहरातील अवैध धंदे २६ जानेवारीपर्यंत बंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यावतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
याच कारवाईचा भाग म्हणून जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमियमजवळ सार्वजनिक जागी संशयित रवींद्र रामचंद्र दांईजे (रा. जाम मोहल्ला) व योगेश शंकर जाधव (रा. बद्री) हे सट्टा बंद असतानाही लोकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्या कब्जातून २२४० रुपये रोख रक्कम व सट्टा जुगाराचे साहित्य जप्त केले.
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सोपान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला २९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी तेजस पारीसकर करीत आहेत.
या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.


