भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील श्री नवशक्ती ध्वजेश्वरी महाकाली देवी मंदिरात श्री बालयोगी गेंदानाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पाच दिवसीय महामृत्युंजय शिवशक्ती महायज्ञाची शुक्रवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. शहरासह तालुका परिसरात सुख, शांती व समृद्धी नांदावी, लोककल्याण व्हावे तसेच अकाल मृत्यू, कालसंकट, अपघात, रोगराई आणि विविध संकटांचे निवारण व्हावे, या उदात्त संकल्पनेतून या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यानिमित्त गुरुवारी मंदिरात शिवशक्ती पर्जन्याभिषेक आणि नानाविध रसांसह स्वाहाकार विधी संपन्न झाला. तसेच श्री राधा मुरलीधर मंदिराच्या वतीने हरिनाम कीर्तन व नामजप यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि नामस्मरणामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. शुक्रवारी महायज्ञाच्या समारोपाच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत स्थापित देवतांचे पूजन व स्वाहाकार करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत महायज्ञाची पूर्णाहुती व महाआरती पार पडली. यावेळी उपस्थित साधू-संतांच्या सान्निध्यात आणि भाविकांच्या भक्तिभावपूर्ण सहभागाने पाच दिवसीय धार्मिक सोहळ्याची विधिवत सांगता करण्यात आली. या महायज्ञ व अभिषेक सोहळ्याप्रसंगी श्री बालयोगी गेंदानाथजी महाराज, नगरसेविका डॉ. छाया देशमुख, रुपेश देशमुख, गोटू गोरवाळकर, राजेश जोशी, संदीप परचुरे, प्रशांत परचुरे, राहुल कुळकर्णी, धीरज पंडित, संतोष गुप्ता, निलेश कटारिया, मनोज चौधरी, प्रकाश लोडते, हर्षल चौधरी, गणेश कनोजिया, गोरा खरारे यांच्यासह शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो कॅप्शन : भुसावळ येथील श्री नवशक्ती ध्वजेश्वरी महाकाली देवी मंदिरात आयोजित पाच दिवसीय महामृत्युंजय शिवशक्ती महायज्ञाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी श्री बालयोगी गेंदानाथजी महाराज व उपस्थित मान्यवर.



