आझाद मैदानावर कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व शिक्षक संघटनेचे राज्यस्तरीय धरणे आंदोलन; नाशिक विभागासह जळगाव, धुळे, नंदुरबारमधील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार** वरणगाव (प्रतिनिधी) :** राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये मागासवर्गीयांच्या सुमारे अडीच लाख जागा अद्याप रिक्त असून, या जागा तातडीने भरण्यात याव्यात, पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यस्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार असून, राज्यभरातील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी केले आहे. गेल्या २०१७ पासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नावर महासंघाने शासनाकडे वारंवार निवेदने देऊन, बैठका घेऊन तसेच विविध आंदोलने करून पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्यापही याबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याने पात्र अधिकारी व कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. केंद्र शासनाने १५ जून २०१८ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी संघटनेची मागणी आहे. याशिवाय राज्यातील रिक्त आरक्षित पदे नियमानुसार भरणे, नियमित नोकरभरती राबविणे, कंत्राटी भरतीच्या धोरणाचा पुनर्विचार करणे, विविध संवर्गांतील वेतन त्रुटी दूर करणे आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, या प्रमुख मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे. **विविध संवर्गांतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडणार** पदोन्नती प्रक्रियेतील अडथळे दूर करणे, वाहनचालक व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करणे तसेच दिव्यांग शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणीही या आंदोलनातून शासनापुढे मांडण्यात येणार आहे. **नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन** या आंदोलनात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिक विभागाशी संलग्न जळगाव, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाचे नाशिक कोषागार विभागाचे नेते तथा कामगार नेते रविंद्र गायकवाड यांनी केले आहे. यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष रविंद्र तायडे, जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विज्ञान सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश अडकमोल, जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रमोद लोंढे, जलसंपदा विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे, महसूल विभागाचे जिल्हाध्यक्ष महेश सपकाळे, महानगरपालिका विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाडे, वनविभागाचे विकास सोनवणे यांच्यासह महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, पदोन्नतीतील आरक्षण, रिक्त पदांची भरती आणि जुनी पेन्शन यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.



