गोहत्या, गोतस्करी रोखण्यासह छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी युवा हिंदू प्रतिष्ठानचे बेमुदत उपोषण!उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलकांची प्रकृती खालावली; उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर कारवाईच्या अपेक्षा

खामगाव (प्रतिनिधी) : खामगाव शहरातील सज्जनपुरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच शहर व परिसरातील कथित अवैध गोहत्या आणि गोतस्करीला आळा घालून बैल बाजारातील नियमबाह्य पशुविक्री व वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी युवा हिंदू प्रतिष्ठानच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलकांची प्रकृती खालावल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात धाव घेत निवेदन सादर केले. यावेळी संबंधित प्रकरणांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

खामगाव शहरातील सज्जनपुरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर तसेच त्याच्या साथीदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. यासोबतच परिसरात कायद्याचे पालन न करता गोहत्या व गोतस्करी सुरू असल्याचा आरोप युवा हिंदू प्रतिष्ठानने केला आहे.

बैल बाजारात पशुविक्री करताना शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचा मुद्दाही आंदोलनातून उपस्थित करण्यात आला आहे. जनावरांच्या कानात आवश्यक ओळख टॅग नसणे, फिटनेस प्रमाणपत्राचा अभाव तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या प्रकारांमुळे पशुसंवर्धनविषयक नियमांची पायमल्ली होत असून, संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वीही युवा हिंदू प्रतिष्ठानच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बैल बाजारात नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचा आरोप करत संघटनेने आता बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी योगेश डोईफोडे, सोनू कौशल आणि शुभम नवघरे यांची प्रकृती खालावली. ही बाब समजताच युवा हिंदू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित पगारिया, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे उद्धवजी नेरकर, गोसेवा गतिविधीचे विठ्ठलजी दाते तसेच भुसावळ येथील गोसेवक रोहित महाले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थानिक संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत प्रकरणाची दखल घेण्याचे निर्देश दिले. तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि बैल बाजारात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान, गोवंशाचे संरक्षण आणि पशुबाजारातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता प्रशासन कोणती ठोस कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.