भुसावळ ( प्रतिनिधी )- आज १७ नोव्हेंबर शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रेल्वे स्टेशन परिसरातील वरणगाव रोड येथील त्यांच्या शिवभोजन केंद्रात सकाळी ११.३० वाजता १२५ गरीब व गरजू नागरिकांना मोफत भोजन तसेच दिवाळी फराळातील शेव आणि बुंदीचे वाटप करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या अन्नदान व फराळ वाटप उपक्रमातून त्यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन, धूप-दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरप्रमुख गणेश चौधरी आणि ज्येष्ठ शिवसैनिक शरद जैस्वाल यांच्या हस्ते हा पूजन सोहळा पार पडला. यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी ‘अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर रहे’, ‘परत या साहेब, परत या साहेब’ अशा भावपूर्ण घोषणा देत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून उपस्थित १२५ गरीब व गरजू नागरिकांना भोजनासह दिवाळी फराळातील शेव आणि बुंदीचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना अन्नदानाचा आधार देण्यात आला. या प्रसंगी उपशहरप्रमुख राकेश खरारे, शिवसैनिक अॅड. मिलिंद कापडे, अरुण साळुखे, अन्सार शाह, पीयूष शर्मा यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हाच साहेबांचा विचार पुढे नेणार – उमाकांत शर्मा यावेळी मनोगत व्यक्त करताना उमाकांत शर्मा (नमा) म्हणाले की, ‘बाळ’ नावाचा बापमाणूस, असा देवमाणूस पुन्हा होणे शक्य नाही. साहेब आज आपल्यात प्रत्यक्ष नसले तरी ते कुठेही गेलेले नाहीत. ते प्रत्येक कट्टर शिवसैनिकाच्या हृदयात कायम आहेत आणि यापुढेही राहतील. त्यांनी आम्हाला दिलेली शिकवण म्हणजेच ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा विचार आम्ही शिवसैनिक म्हणून आजही आचरणात आणत आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला समाजकारणाची योग्य दिशा आणि मार्ग दाखवला आहे. त्याच मार्गावर चालत आम्ही आजही समाजातील गरीब, गरजू आणि वंचित घटकांसाठी कार्य करत आहोत. भविष्यातही हेच समाजसेवेचे कार्य अविरत सुरू ठेवणार आहोत. समाजकारणाचा हा विचार आणि शिकवण शिवसैनिकांनी कायम जपली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.



