भुसावळात सुख-शांती व पर्जन्यवृष्टीसाठी ‘महाकाली मृत्युंजय शिवशक्ती यज्ञा’ला प्रारंभ ; १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान पाच दिवसीय धार्मिक सोहळा; सर्वधर्मीय भाविकांचा सहभाग ;

भुसावळ (प्रतिनिधी) - भुसावळ शहर व तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून घडणाऱ्या अकाली मृत्यू, खून तसेच तरुणांच्या आत्महत्यांसारख्या दुर्दैवी आणि चिंताजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुख-शांती नांदावी, तसेच तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन मुबलक पर्जन्यवृष्टी व्हावी, या सद्भावनेतून ‘महाकाली मृत्युंजय शिवशक्ती यज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. जामनेर रोडवरील महाकाली गजोधारी मंदिर धाम (साईबाबा मंदिरासमोर, भुसावळ) येथे १६ नोव्हेंबरपासून या पाच दिवसीय धार्मिक सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला आहे. हा यज्ञ २० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

**सर्वधर्मसमभावातून सुख-शांतीसाठी प्रार्थना**

शहर व तालुक्यातील दुर्दैवी घटनांची मालिका थांबावी, नागरिकांच्या जीवनात शांतता, समाधान आणि समृद्धी नांदावी, तसेच निसर्गाची कृपा होऊन दुष्काळाचे सावट दूर व्हावे, या उद्देशाने सर्वधर्मीय भाविकांच्या सहभागातून या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः तरुण पिढीला सद्बुद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना यज्ञाच्या माध्यमातून केली जात आहे. सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेशही या उपक्रमातून दिला जात आहे.

**रोज सकाळी व सायंकाळी पाच जोडप्यांचा सहभाग**

मंगळवारपासून महायज्ञाला विधिवत सुरुवात झाली असून दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी पाच जोडपी यज्ञविधीत सहभागी होत आहेत. धार्मिक मंत्रोच्चार, पूजाविधी आणि यज्ञाहुतींनी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

या महायज्ञाच्या पूजाविधीत बालयोगी गेंदानाथ महाराज, धीरज पंडित, संजय चौधरी, पंडित गोटू गोरवाळकर, संदीप परचुरे, राजेश जोशी, निलेश कटारिया, राहुल वशिष्ट, प्रशांत परचुरे, गणेश कनोजिया, संतोष गुप्ता, सोनू गुजर आणि किरण मिस्त्री यांची उपस्थिती आहे. या महायज्ञाचे आयोजन बालयोगी गेंदानाथ महाराज यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

**महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन**

१६ ते २० नोव्हेंबरदरम्यान आयोजित या पाच दिवसीय महायज्ञाच्या धार्मिक सोहळ्यात भुसावळ शहर व परिसरातील नागरिकांनी तसेच सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.