के. नारखेडे विद्यालयात ‘माझी यशोगाथा’ उपक्रमांतर्गत व्याख्याते डी. एच. पाटील यांचे ‘वाचन : यशाचा मार्ग’ विषयावर व्याख्यान ;

भुसावळ (प्रतिनिधी)- के. नारखेडे विद्यालय, भुसावळ येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘माझी यशोगाथा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्याख्याते प्रा डॉ श्री. डी. एच. पाटील ( कला वाणिज्य महाविद्यालय भालोद) यांनी विद्यार्थ्यांना ‘वाचन : यशाचा मार्ग’ या विषयावर मार्गदर्शन करताना आपल्या जीवनाची प्रेरणादायी यशोगाथा सांगितली.
मार्गदर्शन करताना प्रा पाटील यांनी सांगितले की, विचार आणि संस्कार घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्य करते. बालपणापासूनच वाचनाची आवड निर्माण झाल्यास समाजजीवनाच्या विविध अंगांचा अनुभव घेता येतो आणि व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भता वाढण्यास मदत होते. चरित्रवाचनातून प्रेरणा मिळते, तसेच विविध साहित्यप्रकारांच्या वाचनामुळे ज्ञान, कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती विकसित होते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. नियमित वाचनाची सवय जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन निर्माण करते आणि यशाचा मार्ग सुकर करते, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय अंगीकारून आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच व्याख्यात्यांचा परिचय श्री. शैलेंद्र महाजन यांनी करून दिला. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. बी. बी. जोगी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका श्रीमती संगीता अडकमोल आणि उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी श्री. एस. डी. वासकर यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत वाचनाचे महत्त्व जाणून घेतले.