भुसावळ (प्रतिनिधी )- भाऊ-बहिणींच्या पवित्र नात्यातील प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक असलेल्या भाऊबीजेच्या शुभप्रसंगी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजमध्ये १५ नोव्हेंबर रोजी स्नेहसंमेलन व अतिथी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. प्रेम, बंधुत्व आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, सोशल मीडिया प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वंदना वाघचौरे उपस्थित होत्या. यावेळी सद्दाम खाटिक, अझर भाई, मझर भाई, सादिक भाई, रितेश भारंबे, अॅड. जितेंद्र मेश्राम, सिद्धांत तायडे, शोएब भाई, फिरोज ताडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सद्दाम भाई, सादिक भाई आणि अझर भाई यांनी भाऊबीजेचे महत्त्व विशद करताना भाऊ-बहिणींच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि परस्पर सहकार्याची भावना अधोरेखित केली. तसेच अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करून भविष्यातही संस्थेला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ‘आजपासून मी तुमची वंदना ताई’ या शब्दांनी जिंकली उपस्थितांची मने! कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक क्षण डॉ. वंदना वाघचौरे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना अनुभवायला मिळाला. त्यांनी उपस्थितांना उद्देशून, ‘आजपासून मी केवळ डॉ. वंदना मॅडम नसून, तुमची वंदना ताई आहे,’ असे प्रेमळ संबोधन केले. त्यांच्या या आपुलकीच्या शब्दांनी उपस्थित पाहुणे आणि विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श केला. संपूर्ण वातावरणात कौटुंबिक जिव्हाळा, प्रेम आणि भावनिक एकतेची भावना निर्माण झाली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही या नात्याचा आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे मिठाई, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्वागत सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्रशासकीय प्रमुख अंजुम खान यांनी प्रभावी आणि भावपूर्ण शैलीत सूत्रसंचालन केले. आर्या फाउंडेशनच्या प्राचार्या रजनी बदगुजर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्याख्याता मनीषा बावस्कर आणि व्याख्याता परवेझ सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांनी आणि संपूर्ण शिक्षक व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी डॉ. वंदना वाघचौरे यांनी उपस्थित पत्रकार, सोशल मीडिया प्रतिनिधी, आमंत्रित पाहुणे, बंधू आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजमध्ये आयोजित या स्नेहसंमेलनातून प्रेम, आदर, बंधुत्व आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता माणुसकीच्या नात्यांना अधिक दृढ करणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.



