नाशिक (प्रतिनिधी )- इचलकरंजी येथील पौरोहित्य करणारे गुरुजी मंदार अजित रानडे यांची आंतरजातीय विवाहाचे पौरोहित्य केल्याच्या कारणावरून दिवसाढवळ्या अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. या घटनेचा अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक यांच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निषेधपत्रात म्हटले आहे की, आंतरजातीय विवाहाचे पौरोहित्य केले म्हणून एखाद्या व्यक्तीची हत्या होणे ही समाजासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक सलोखा, व्यक्तिस्वातंत्र्य आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. कोणत्याही व्यक्तीला जातीय अथवा सामाजिक कारणावरून हिंसक कृत्य करण्याचा अधिकार नाही. या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, अशी ठाम मागणी संस्थेने केली आहे. दरम्यान, दिवंगत गुरुजी मंदार अजित रानडे यांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संस्था सहभागी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिकचे अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या वतीने हा निषेध नोंदविण्यात आला असून, निषेधपत्रावर संस्थेचे कार्यवाह अॅड. सुहास भणगे यांची स्वाक्षरी आहे. दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी हे निषेधपत्र प्रसिद्ध करण्यात आले



