भुसावळ (प्रतिनिधी) - वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर परिसरात जुन्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री घडली. या घटनेत एका गटाकडून घरावर दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि घरातील साहित्याचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप आहे. तर दुसऱ्या गटाने लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून वरणगाव पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घरावर दगडफेक करून वाहनांची तोडफोड रुपाली अनिल इंगळे (वय ३८, रा. सिद्धेश्वर नगर) यांच्या फिर्यादीनुसार, रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्या पती व मुलांसह घरी असताना काही पुरुष व महिला आरडाओरड आणि शिवीगाळ करीत त्यांच्या घराकडे आल्या. हातात लाठ्याकाठ्या घेऊन आलेल्या जमावाने घरावर दगडफेक केल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर निलेश काळे, मुकेश काळे, नाना माळी, राजेंद्र माळी, सोनू उर्फ नाट्या राजपूत, राहुल राखुंडे, धीरज ठाकूर, सागर साबळे, आकाश साबळे, ताई कोळी, सोनी मुकेश काळे आणि निलेश काळे यांची आई अशा १२ जणांनी लाठ्याकाठ्यांसह घरात अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी घराच्या आवारातील चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड, खिडक्यांच्या काचा फोडणे तसेच घरातील साहित्याचे नुकसान करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मनोज कचुरे यांना मारहाण केल्याचाही आरोप याच घटनेदरम्यान मीना विनोद कचुरे यांच्या घरी जाऊन त्यांचा मुलगा मनोज कचुरे याला लाठ्याकाठ्यांनी हातापायांवर मारहाण करून दुखापत केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसऱ्या गटाकडून चाकूने वार केल्याची तक्रार दरम्यान, दुसऱ्या गटातील निलेश एकनाथ काळे (वय ३५, रा. सिद्धेश्वर नगर) यांनीही पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वामननगरजवळ रेल्वे बोगद्याच्या आधी त्यांची मोटारसायकल अडविण्यात आली. यावेळी आशू अनिल इंगळे, शांताराम भिल आणि सागर माळी यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. आशू इंगळे याने लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली, शांताराम भिल याने चाकूने हातावर वार केला, तर सागर माळी याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल करीत आहेत.



