भुसावळात फॅन्सी नंबर प्लेटविरोधात कारवाई करावी – काँग्रेस कमिटीची मागणी;

भुसावळ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भुसावळ तर्फे शहरातील फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आज बुधवारी भुसावळ येथील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश महाले यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, शहरात अनेक वाहनांवर रस्ते व वाहतूक नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हाइवे (MORTH) यांच्या नियमांनुसार वाहनांच्या नंबर प्लेट ठराविक स्वरूपात असणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक वाहनांवर फॅन्सी फॉन्ट, स्टिकर किंवा पेंटेड नंबर प्लेटचा वापर होत असून हे बेकायदेशीर आहे.

तत्काळ दोनचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनधारकांवर नियमानुसार कारवाई करावी तसेच नियमबाह्य नंबर प्लेट्स हटवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा काँग्रेस कमिटी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण सुरवाडे, योगेंद्र सिंह पाटील, मो. मुनव्वर खान, नगरसेवक व अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अहेमद कुरैशी, माजी युवा अध्यक्ष इस्माईल पहेलवान तसेच नितीन पटाव, पवन भैरूणे, साजिद भाई, संजय खडसे, रहीम कुरैशी आदी उपस्थित होते.