भुसावळमध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

देवगिरी कल्याण आश्रम महिला पदाधिकाऱ्यांकडून प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन

भुसावळ (प्रतिनिधी)  आदिवासी समाजाचे महानायक, क्रांतिकारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती तथा जनजाती गौरव दिन भुसावळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

जामनेर रोडवरील बिरसा मुंडा चौकात आज सकाळी ११ वाजता देवगिरी कल्याण आश्रमाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आदरांजली वाहण्यात आली.

भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघर्ष करत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे धैर्य, त्याग आणि समाजजागृतीचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी देवगिरी कल्याण आश्रमाचे जिल्हा कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, उपजिल्हा कोषाध्यक्ष ॲड. जयश्री देशमुख, शिक्षा आयाम जिल्हाध्यक्ष ॲड. मंजुषा कुलकर्णी, तालुकाध्यक्ष तथा पत्रकार उज्वला बागुल, सौ. संगीता काटधरे  आणि प्रा. मनीषा देशमुख यांची उपस्थिती होती.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने जपण्याचे आवाहन केले.