भुसावळ (प्रतिनिधी ) -: शहरातील नागरिकांना गॅस सिलिंडर मिळण्यात होत असलेल्या अडचणींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गॅस बुकिंग करूनही अनेक दिवस सिलिंडर घरपोच मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर, आता पूर्वीप्रमाणेच घरपोच सिलिंडर वितरण सक्तीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे यांनी सर्व गॅस पुरवठादार कंपन्या व एजन्सींना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ग्राहकांना थेट एजन्सी किंवा गोदामातून सिलिंडर देण्याची पद्धत तात्काळ बंद करावी. त्याऐवजी प्रत्येक ग्राहकाला नियमानुसार घरपोच सेवा देणे बंधनकारक असेल.
शहरात अनेक ग्राहकांनी बुकिंगनंतर ओटीपी मिळूनही १५ दिवसांपर्यंत सिलिंडर न मिळाल्याची तक्रार केली होती. तसेच काही एजन्सींनी घरपोच सेवा बंद करून ग्राहकांना एजन्सीकडे येण्यास भाग पाडल्याचेही समोर आले होते. या प्रकारामुळे ग्राहकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या आणि एजन्सींवर गर्दी वाढत होती.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, गॅस वितरणात पारदर्शकता ठेवण्याचे तसेच कोणताही तुटवडा भासू न देण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, घरपोच सिलिंडर सेवा न मिळाल्यास नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभाग किंवा संबंधित तालुका पुरवठा कार्यालयात तक्रार नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे.


