सातपुड्याच्या कुशीत अंतर्नाद प्रतिष्ठानने उजळवला माणुसकीचा दीप! वाटीभर फराळ उपक्रमाचे 11 वे वर्ष;

 पानशेवडी आणि चांदण्यातलाव येथील आदिवासी कुटुंबांसोबत साजरी केली आनंदाची दिवाळी; दात्यांच्या सहकार्यातून वंचित कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
भुसावळ (प्रतिनिधी ):

एखादा सामाजिक संकल्प एका दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षानुवर्षे जपला जातो, तेव्हा त्याचे रूपांतर एका सुंदर परंपरेत होते. भुसावळ येथील ‘अंतर्नाद प्रतिष्ठान’ने गेल्या अकरा वर्षांपासून जपलेली आदिवासी पाड्यांवरील दिवाळी साजरी करण्याची परंपरा याचेच उदाहरण आहे. यंदाही प्रतिष्ठानच्या सदस्यांनी चोपडा तालुक्यातील पानशेवडी आणि चांदण्यातलाव या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. ‘एक वाटी फराळ आणि नवीन कपडे द्या, वंचितांची दिवाळी गोड करा’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे यंदा अकरावे वर्ष आहे.

एका छोट्या संकल्पनेचा अकरा वर्षांचा प्रवास

२०१६ मध्ये चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथे या उपक्रमाची सुरुवात झाली. दिवाळीचा आनंद केवळ शहरांपुरता किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांपुरता मर्यादित न राहता दुर्गम भागातील आदिवासी बांधवांनाही तो अनुभवता यावा, ही यामागची मूळ भावना होती. सुरुवातीला काही सदस्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या उपक्रमाला हळूहळू नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला. त्यातूनच हा उपक्रम एका सामाजिक चळवळीचे स्वरूप घेऊ लागला. गेल्या अकरा वर्षांत प्रतिष्ठानने सातपुड्यातील विविध दुर्गम पाड्यांवर जाऊन तेथील बांधवांसोबत दिवाळी साजरी केली आहे. दरवर्षी नवीन पाडा निवडून तेथील कुटुंबांपर्यंत आनंद पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.

यंदा दोन पाड्यांवर आनंदाची दिवाळी

यंदाच्या वर्षी पानशेवडी आणि चांदण्यातलाव या दोन आदिवासी वस्त्यांची निवड करण्यात आली होती. या ठिकाणी नवीन कपडे, फराळ, मिठाई, शैक्षणिक साहित्य, नवीन भांडी, नवीन चपला तसेच थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. नवीन कपडे हातात मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य, डोळ्यांतील चमक आणि आनंदाने बागडणारी चिमुकली पावले हे या उपक्रमाचे खरे समाधान ठरले. वस्तूंचे वाटप हा या उपक्रमाचा एक भाग असला, तरी आदिवासी कुटुंबांसोबत काही क्षण घालवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे, याला प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अधिक महत्त्व दिले.

दात्यांच्या विश्वासातून सेवाकार्याला बळ

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला मिळणारा लोकसहभाग. ‘एक वाटी फराळ आणि नवीन कपडे द्या’ या आवाहनाला दरवर्षी असंख्य दाते उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. कुणी फराळ तयार करून देते, कुणी नवीन कपडे व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देते, तर कुणी आर्थिक मदतीच्या माध्यमातून हातभार लावते. यंदाही विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक संस्था, व्यापारी, नागरिक आणि अनेक दात्यांनी या उपक्रमाला सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळेच दुर्गम पाड्यांवरील कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करणे शक्य झाले.

आनंद वाटला की तो अनेक पटींनी परत मिळतो!

या उपक्रमाबाबत प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सांगितले की, गेल्या अकरा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवता आला, यामागे दात्यांचा विश्वास आणि सहकार्य हीच खरी ताकद आहे. आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. या कार्यातून मिळणारे समाधान शब्दांत व्यक्त करता येणार नाही. एखाद्या चिमुकल्याच्या हातात नवीन कपडे देताना त्याच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य आणि एखाद्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होता येणे, हीच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे. आनंद वाटला की तो अनेक पटींनी आपल्याकडे परत येतो, याची अनुभूती या उपक्रमातून दरवर्षी मिळते.

दिवाळी म्हणजे केवळ घराची रोषणाई, सजावट आणि फराळ नव्हे, तर आपल्या आनंदात दुसऱ्यांनाही सहभागी करून घेणे, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा एखादा क्षण निर्माण करणे, हाच या उपक्रमाचा संदेश आहे. सातपुड्याच्या कुशीत सुरू झालेली माणुसकीची ही ज्योत अकराव्या वर्षातही तेवत असून, आगामी काळातही हा सेवाप्रवास अधिक व्यापक करण्याचा निर्धार अंतर्नाद प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.

उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे, समन्वयक प्रसन्ना बोरोले, समाधान जाधव, सह समन्वयक जीवन महाजन, प्रदीप सोनवणे, कुंदन वायकोळे, हितेंद्र नेमाडे, राहुल भारंबे, ज्ञानेश्वर घुले, ललित महाजन, विक्रांत चौधरी, चंद्रकांत सूर्यवंशी, अमित कुमार पाटील, प्रा श्याम दुसाने, अतुल चौधरी, वर्षा अहिरराव, भारती ठाकरे, अमित चौधरी, संदीप बोरोले, शिरीष कोल्हे, विपिन वारके, तेजेंद्र महाजन, राजू वारके, केतन महाजन, कपिल धांडे, स्वप्नील जावळे, हरीश भट, योगेश साळुंके, यश वारके, शर्वरी पाटील अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले