उन्हाळी गर्दी कमी करण्यासाठी कोयंबटूर–जयपूर दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी

भुसावळ (प्रतिनिधी) – उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोयंबटूर ते जयपूर दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवेअंतर्गत एकूण १८ फेऱ्या चालविण्यात येणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ट्रेन क्रमांक 06181 ही साप्ताहिक विशेष गाडी ९ एप्रिल २०२६ ते ४ जून २०२६ या कालावधीत दर गुरुवारी कोयंबटूर येथून पहाटे ०२:३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १३:२५ वाजता जयपूर येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण ९ फेऱ्या नियोजित आहेत.

परतीसाठी ट्रेन क्रमांक 06182 ही विशेष गाडी १२ एप्रिल २०२६ ते ७ जून २०२६ दरम्यान दर रविवारी जयपूर येथून रात्री २२:०५ वाजता सुटेल आणि चौथ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता कोयंबटूर येथे पोहोचेल. या मार्गावरही ९ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

या गाडीला तिरुप्पूर, इरोड, सालेम, जोलारपेट्टई, कटपडी, रेणिगुंटा, कडपा, येर्रगुंटला, गुटी, धोणे, कर्नूल सिटी, गडवाल, महबूबनगर, काचेगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, भरुच, वडोदरा, गोध्रा, रतलाम, जावरा, मंदसौर, नीमच, चित्तौडगड, भीलवाडा, बिजयनगर, नसीराबाद, अजमेर आणि किशनगड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे दिले आहेत.

या विशेष गाडीची रचना १८ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे आणि २ जनरेटर कार अशी असणार आहे.

प्रवाशांना तिकीट आरक्षणासाठी ‘RailOne’ ॲपचा वापर करता येणार असून, गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळ किंवा NTES ॲपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने सांगितले की, या विशेष गाडीमुळे दक्षिण आणि उत्तर भारत दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, उन्हाळी गर्दी कमी करण्यास मदत होईल.