भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाची उल्लेखनीय कामगिरी; चोरीच्या संशयिताला पकडले, प्रवाशांचा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज सुरक्षित परत ! अमरावती स्थानकावर मोटारसायकल चोरीतील संशयित ताब्यात; बडनेरा येथे विसरलेले मोबाईल, पर्स प्रवाशांना केले सुपूर्द

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांनी सतर्कता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच चोरीच्या घटनांना आळा घालणे आणि प्रवाशांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू शोधून त्या सुरक्षितपणे परत मिळवून देण्यात जवानांना यश आले आहे. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी अमरावती आणि बडनेरा रेल्वे स्थानकांवर तीन महत्त्वपूर्ण कारवाया करण्यात आल्या.

अमरावती स्थानकावर मोटारसायकल चोरीतील संशयित ताब्यात

'ऑपरेशन यात्री सुरक्षा' अंतर्गत रेल्वे सुरक्षा दल पोस्ट अमरावती येथील प्रधान आरक्षक जितेंद्र बांते आणि आरक्षक राजेश भिसे यांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली. मोटारसायकल चोरीच्या प्रकरणातील संशयित जितेश ऊर्फ राहुल बबनराव कांबळे (वय २७) याला अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वरून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान संबंधित संशयिताविरुद्ध जीआरपी बडनेरा येथे गुन्हा क्रमांक २१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला जीआरपी अमरावती यांच्या स्वाधीन करण्यात आले.

बडनेरा येथे १८ हजार ५०० रुपयांची पर्स केली परत

'ऑपरेशन अमानत' अंतर्गत आरक्षक रितेश चौके यांनी गाडी क्रमांक ०१०८३ च्या एस/४ डब्यातील आसन क्रमांक २५ वर प्रवाशाची विसरलेली पर्स ताब्यात घेतली. या पर्समध्ये २ हजार ५०० रुपये रोख, विवो कंपनीचा मोबाईल, चांदीच्या पैंजण्या आणि एटीएम कार्ड असा एकूण अंदाजे १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.

आवश्यक ओळख पडताळणी आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा ऐवज प्रवाशाचे पुतणे पीयूष पंजाबी यांच्याकडे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आला.

१० हजार रुपयांचा मोबाईलही मालकाला परत

याच मोहिमेअंतर्गत प्रधान आरक्षक राहुल तिरपुडे हे बडनेरा रेल्वे स्थानकाच्या नागपूर दिशेकडील फलाटावरील पादचारी पुलावर गस्त घालत असताना त्यांना रेडमी कंपनीचा मोबाईल बेवारस अवस्थेत आढळून आला. अंदाजे १० हजार रुपये किमतीच्या या मोबाईलची ओळख पटवून मूळ मालक महेंद्र सिंह लखनपाल सिंह यांना तो सुरक्षितपणे परत करण्यात आला.

आरपीएफच्या तत्परतेचे प्रवाशांकडून कौतुक

रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी एकाच दिवशी केलेल्या या तीन कारवायांमधून प्रवाशांच्या सुरक्षेबाबतची त्यांची सजगता अधोरेखित झाली आहे. एका बाजूला मोटारसायकल चोरीच्या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेण्यात आले, तर दुसरीकडे प्रवाशांचा एकूण २८ हजार ५०० रुपयांचा मौल्यवान ऐवज सुरक्षितपणे परत करण्यात आला.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, संरक्षा आणि सुविधा यांना प्राधान्य देत मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग कार्यरत असून, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या या कर्तव्यदक्ष कामगिरीचे विभागीय रेल्वे प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे.