भुसावळ (प्रतिनिधी )-
जिल्ह्यासह महाराष्ट्रात ऑक्सीजन तुटवडा भासत असल्याचे बाब समोर असतानाच पहिलाच ऑक्सीजन प्लाँट माझ्या जळगाव जिल्ह्यात आमदार निधीतून उभा राहत असल्याची बाब निश्चितच आनंददायी आहे. जिल्ह्यात दहा कोटींचा निधी डीपीडीसीतून ऑक्सीजन प्लाँट उभे राहण्यासाठी देण्यात आला आहे शिवाय भुसावळसाठी भविष्यात एक कोटी नऊ लाख रुपयांचे इस्टीमेट तयार असून तेही गरज पडल्यास मंजूर करण्यात येईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील येथे म्हणाले. 1मे शनिवारी रोजी सायंकाळी पाच वाजता ट्रामा केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटलच्या आवारात प्रकल्पाचे औपचारीक उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले की, ऑक्सीजन प्लाँट सुरू झाल्याने मोठा दिलासा भुसावळकरांना मिळाला आहे शिवाय ग्रामीण रुग्णालयातील अपूर्ण सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येतील. जिल्ह्यातील मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, मोहाडी, जळगाव, धरणगाव, पारोळासह दहा ठिकाणी अशाच पद्धत्तीने प्लाँट उभे राहतील, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, तिसर्या लाटसाठी आम्ही सज्ज आहोत. जिल्ह्यातील रुग्णांलयामध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात आला असून ग्रामीण रुग्णालयातील विद्युत प्रश्नासाठी 48 लाख रुपये आमदारांच्या सूचनेवरून मंजूर करण्यात आले तसेच आमदार संजय सावकारे व नगरपालिकेतर्फे ज्या सूचना येतील त्या पूर्ण करण्याची जवाबदारी आमची असेल, असेही गुलाबराव म्हणाले.
आमदार सावकारे
माजी पालकमंत्री व आमदार संजय सावकारे म्हणाले की, महाराष्ट्रात ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेला हा पहिलाच निधीतला प्रकल्प आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत लक्षात आले होते की, ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात लागत असतो व वारंवार ऑक्सीजन सिलिंडर भरण्यासाठी पाठवावे लागण्याची बाबही खर्चिक आहे मात्र आता रुग्णालयातील शंभर बेडसाठी एकाचवेळी ऑक्सीजनची सुविधा पुरवता येणे शक्य झाल्याने शहर तालुक्यातील रुग्णांनाही येथे दिलासा मिळणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौघे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, नगरसेवक मनोज बियाणी, शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, युवराज लोणारी, रवी सपकाळे, निक्की बत्रा, सतीश सपकाळे, शिवसेना शहराध्यक्ष बबलू बर्हाटे, राजीव पारीख, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विश्वनाथ पाटील व पोलिस कर्मचारी तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी, डॉ.नितु.पाटील, डॉ.चाकूरकर डॉ.विक्रांत सोनार व कंत्राटदार अजीतसिंग बेहरा आदी उपस्थित होते.



