संगोपनासहित देशी वृक्षलागवडीचा संकल्प करून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा -डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे नागरिकांना आवाहन ;

दुष्काळ, पाणीटंचाई आणि घटते वनक्षेत्र लक्षात घेता देशी वृक्षांचे संवर्धन काळाची गरज

भुसावळ (प्रतिनिधी ): दिवाळीचा सण वसुबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा सर्वत्र दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येकाने ओळखणे गरजेचे आहे. वाढती वृक्षतोड, कमी होत असलेले जंगलक्षेत्र, शेतशिवारातील वृक्षांची घटती संख्या आणि रस्ते रुंदीकरणामुळे तोडली जाणारी झाडे यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी केवळ पारंपरिक पद्धतीने साजरी न करता देशी वृक्षांची लागवड व त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.

देशी वृक्षांची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. त्यामुळे भूजल पातळी टिकवून ठेवण्यास आणि पाणी पुनर्भरणास हातभार लागतो. मात्र, अशा वृक्षांची संख्या कमी होत असल्याने भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत असून अनेक भागांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

दिवाळीच्या सणात आपण 'दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी' असे म्हणत वसुबारसेला गाई-म्हशींचे पूजन करतो. परंतु आज शेतीसाठीच नव्हे, तर माणसांसह जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजन करताना निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी दुष्काळामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर भाऊबीजेच्या सणात लहान मुलांना खेळण्यासाठी, झोके घेण्यासाठी मोठी झाडेही दिसेनाशी होत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन अत्यंत आवश्यक आहे.

प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात, शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात देशी वृक्षांची तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या फळझाडांची लागवड करावी. नागरिकांनीही आपल्या घरासमोर किंवा उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत झाडे लावावीत. केवळ वृक्षलागवड करून थांबू नये, तर लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन करून ते जगविण्याची जबाबदारी स्वीकारावी.

यंदाच्या दिवाळीत अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्षलागवड आणि संगोपनाचा संकल्प करावा. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक पेड माँ के नाम' अभियान ३.० मध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. सुरेंद्रसिंग पाटील, संचालक, पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांनी केले आहे.