भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात दिवाळी व छठपूजेच्या सणांदरम्यान प्रवाशांची वाढती संख्या आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन सुरक्षित, सुखकर आणि सुव्यवस्थित रेल्वे प्रवास सुनिश्चित करण्यासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय तसेच वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन विविध गंतव्यस्थानांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या अंतर्गत भुसावळ विभागातून एकूण ८२ हून अधिक विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई–नागपूर, पुणे–नागपूर, अमरावती–उधना, अमरावती–पुणे, मुंबई–गोरखपूर, मुंबई–दरभंगा, मुंबई–बनारस, पुणे–दानापूर आणि पुणे–गोरखपूर या विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. दिवाळी व छठपूजेच्या सणांदरम्यान प्रवाशांच्या मोठ्या गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी भुसावळ विभागाने व्यापक गर्दी व्यवस्थापन योजना लागू केली आहे. प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, त्यांना त्वरित मदत उपलब्ध करून देणे तसेच गर्दीच्या काळात प्रवाशांची ये-जा सुरळीत आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी विविध स्थानकांवर अधिकारी, पर्यवेक्षक आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानक परिसर आणि फलाटांवरील प्रवाशांची ये-जा तसेच गर्दीच्या परिस्थितीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे, जेणेकरून कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास तातडीने आवश्यक उपाययोजना करता येतील. सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित, सुखकर आणि उत्तम प्रवासाचा अनुभव मिळावा, हा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला आणि खंडवा या स्थानकांवर प्रवाशांची सुरक्षितता आणि गर्दीचे नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, तिकीट तपासनीस आणि वाणिज्य पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, रेल्वे स्थानकांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चोवीस तास (२४×७) ड्युटी लावण्यात आली आहे. प्रवाशांची सोय आणि गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष व्यवस्था - फलाटांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. - प्रवाशांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख स्थानकांवर मदत कक्ष (हेल्प बूथ) स्थापन करण्यात आले आहेत. - उद्घोषणा प्रणाली द्वारे रेल्वेगाड्यांची सद्यस्थिती, आगमन, फलाटावर उभी असलेली गाडी तसेच प्रस्थान यासंदर्भात नियमितपणे आणि वारंवार घोषणा करण्यात येत आहेत, जेणेकरून प्रवाशांना वेळेवर आवश्यक माहिती मिळू शकेल. - रेल्वेगाड्यांचे फलाट आधीच निश्चित केले जात असून, ऐनवेळी फलाटामध्ये बदल करण्यात येणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. - स्थानकांवर खाद्यपदार्थांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित केली जात आहे. यामध्ये भोजन, जनता खाना, पॅकेज्ड/बाटलीबंद खाद्यपदार्थ व पेये तसेच पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. - सणासुदीच्या काळात स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे. प्रवाशांना स्वच्छ आणि आरामदायी वातावरण मिळावे यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्रतीक्षालयांची नियमित स्वच्छता सुनिश्चित करण्यात आली आहे. - प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन स्थानक परिसर तसेच सर्क्युलेटिंग एरियामध्ये पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यात येत आहे. - लिफ्ट, एस्केलेटर, बॅटरी कार, पंखे आणि दिव्यांची व्यवस्था यांसह सर्व प्रवासी सुविधांचे सुरळीत कार्य सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्थानक परिसरावर २४×७ देखरेख ठेवण्यात येत असून, सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात कर्मचाऱ्यांची चोवीस तास नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, विभागात २४ तास कार्यरत असलेला वॉर रूम स्थापन करण्यात आला असून, तेथून सातत्याने देखरेख आणि तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे. भुसावळ विभागातील रेल्वे कर्मचारी रेल्वेमार्ग, रोलिंग स्टॉक, विद्युत उपकरणे, प्रवासी सुविधा तसेच सुरक्षा आणि संरक्षेच्या देखभालीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे विभागातील रेल्वे परिचालन सुरळीत आणि सुरक्षितपणे सुरू आहे. कार्यक्षम नियोजन, उत्तम प्रवासी सेवा आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधा व काळजीप्रती कटिबद्धतेच्या माध्यमातून मध्य रेल्वे सणासुदीच्या काळात प्रवाशांना उत्तम सेवा मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. भुसावळ विभागीय रेल्वे प्रशासन प्रवाशांना आवाहन करते की, त्यांनी रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच सणासुदीच्या काळात सुरक्षित आणि सुखकर रेल्वे प्रवासासाठी सहकार्य करावे.


