६२.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह दोन दुचाकी आणि चार मोबाईल जप्त भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर भुसावळ तालुका पोलिसांनी किन्ही एमआयडीसी परिसरात शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी पहाटे २.५५ वाजता छापा टाकून एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन पावडर हस्तगत करण्यात आली असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन मोटारसायकली आणि चार मोबाईल हँडसेटसह एकूण ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. किन्ही एमआयडीसीत पहाटे पोलिसांचा छापा भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील किन्ही एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांची विक्री व साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पहाटेच्या सुमारास नियोजनबद्ध छापा टाकला. यावेळी संशयितांकडून ६२.२१ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) पावडर जप्त करण्यात आली. या अंमली पदार्थाची किंमत २ लाख ४८ हजार ८४० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यापैकी ५५.३३ ग्रॅम एम.डी. असगरखान याच्याकडून हस्तगत करण्यात आली. चौघांना अटक; संशयीत आरोपींची नावे या कारवाईत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : १. रिशभ कुणाल खेडकर (वय १८, रा. कंडारी, भुसावळ) २. प्रथमेश दिलीप आव्हाड (वय २७, रा. दादासाहेब रुपवते सोसायटी, भुसावळ) ३. शेख अफजल शेख रहेमतुल्ला (वय २६, रा. नसरंजी फाईल, भुसावळ) ४. असगरखान अनवरखान (वय ५७, रा. अयान कॉलनी, भुसावळ) दोन दुचाकी, चार मोबाईलसह ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी अंमली पदार्थांसोबतच गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूही जप्त केल्या आहेत. - एम.डी. पावडर : ६२.२१ ग्रॅम – २,४८,८४० रुपये - मोटारसायकली : रॉयल एनफिल्ड बुलेट व पल्सर – ३,२५,००० रुपये - मोबाईल हँडसेट : आयफोन १६, आयफोन १३, टेक्नो व रेडमी – १,५५,००० रुपये अशा प्रकारे एकूण ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २२६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात सहभागी असणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसून, अंमली पदार्थमुक्त जळगाव जिल्ह्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अमलीपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


