भुसावळ तालुक्यातील ११ हजार ७११ शेतकऱ्यांना पाच हजारांची अग्रिम मदत मंजूर!

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा; अनेकांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात

भुसावळ (प्रतिनिधी) : शासनाने भुसावळ तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्यानंतर तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना अग्रिम दुष्काळी मदत म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार भुसावळ तालुक्यातील ११ हजार ७११ खातेदार शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले असून, त्यांच्या मदतीच्या रकमेच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

भुसावळ तालुक्यात एकूण ५४ गावे असून, सुमारे २५ हजार खातेदार शेतकरी आहेत. शासनाच्या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी (Farmer ID) काढलेला आहे, त्यांच्या याद्या ऑनलाइन प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या आयडीवर पाच हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी देण्याचे काम करण्यात आले. तालुक्यातील ११ हजार ७११ खातेदार पात्र ठरले आहेत. सामायिक खात्यामध्ये एका व्यक्तीला या मदतीचा लाभ देण्यात आला आहे.

मदतीच्या रकमेच्या मंजुरीनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, अनेक गावांतील शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर ही मदत मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.

दरम्यान, दिवाळीनंतर शेतकऱ्यांना पुढील मदत कोणत्या स्वरूपात आणि कशा पद्धतीने मिळणार, याबाबत शासन स्तरावर अद्याप धोरणात्मक निर्णय निर्गमित झालेला नाही. शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होताच त्यानुसार तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार नीता यांनी दिली.