जळगावात २० वर्षीय एमबीबीएस विद्यार्थ्याचा वसतिगृहात मृत्यू; सकाळी झोपेतून उठलाच नाही!

 

रात्री उलटी झाल्यानंतर सकाळी आढळला मृत; अमरावतीच्या रुशान अफराज सैयद याच्या निधनाने मेडिकल कॉलेज परिसरात हळहळ

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याचा वसतिगृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुशान अफराज सैयद असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी होता. तरुण वयातील विद्यार्थ्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुशानची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. रात्रीच्या सुमारास त्याला उलटी झाली होती. त्यानंतर तो वसतिगृहातील आपल्या खोलीत झोपला. मात्र, सकाळी बराच वेळ होऊनही तो झोपेतून उठला नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी व संबंधितांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. यासंदर्भात रुशानच्या भावाशी संवाद साधला असता त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. शिकण्याच्या वयात आणि वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्याचा असा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. रुशानचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नसून तपास व वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

एक होतकरू वैद्यकीय विद्यार्थी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.