मॅसानिक लॉज प्रकरणी तहसीलदारांचे सह दुय्यम निबंधकांना आदेश; मिळकतींचे व्यवहार प्रतिबंधित करण्याच्या सूचना

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील मॅसानिक लॉज तसेच संबंधित इतर मिळकतींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर निर्बंध घालण्याच्या दृष्टीने भुसावळ तहसीलदारांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सदर मिळकतींचे कोणतेही व्यवहार होऊ नयेत, यासाठी त्या प्रतिबंधित करण्यात याव्यात तसेच आपल्या स्तरावरून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी, असे आदेश तहसीलदारांनी सह दुय्यम निबंधक यांना दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भुसावळ येथील मॅसानिक लॉज तसेच इतर संबंधित मिळकतींच्या संदर्भात कथित कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्रीचे अनधिकृत व बेकायदेशीर व्यवहार होत असल्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली होती. अशा व्यवहारांपासून सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.

या तक्रारीची दखल घेत सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी चौकशी केली होती. त्यानंतर तहसीलदार भुसावळ यांनी संबंधित मिळकतींचे अभिलेख तपासून त्यामध्ये शर्तभंग झाल्याचे निदर्शनास आल्यास पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले होते. तसेच तहसीलदारांकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत वादग्रस्त मिळकत व मॅसानिक लॉजच्या इतर संबंधित मिळकतींचे व्यवहार होऊ नयेत, यासाठी त्या प्रतिबंधित करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

मात्र, या आदेशांची अपेक्षित अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत केदारनाथ सानप यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे या प्रकरणाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले.

अखेर या प्रकरणाची दखल घेत भुसावळ तहसीलदारांनी सह दुय्यम निबंधकांना आदेश जारी केले आहेत. संबंधित मिळकतींचे व्यवहार होऊ नयेत, यासाठी त्या प्रतिबंधित करण्यासह नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या आदेशामुळे मॅसानिक लॉज व संबंधित मिळकतींच्या व्यवहारांबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच या प्रकरणातील चौकशी आणि पुढील प्रशासकीय कारवाई कडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.