भुसावळ (प्रतिनिधी ) - भुसावळ विधानसभा मतदारसंघात प्रक्रिये दरम्यान १४ हजार ५६२ मतदारांची एसआयआर नावे वगळण्यासाठी बनावट आणि नियमबाह्य हरकती दाखल झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या सर्व हरकती केवळ १८६ व्यक्तींच्या नावाने दि. १२ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी ऑफलाइन पद्धतीने दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी एफआयआर नोंदवून चौकशी करावी, बाधित मतदारांची नावे वगळू नयेत आणि जबाबदार व्यक्ती व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. तीन दिवसात हजारो अर्ज सपकाळ यांनी पत्रात नमूद केले आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. ९ ऑक्टोबर रोजीच्या निर्देशांद्वारे एका व्यक्तीला दावे आणि हरकतींच्या संपूर्ण कालावधीत जास्तीत जास्त १० फॉर्म-७ अर्ज दाखल करण्याची मर्यादा निश्चित केली आहे. ही मर्यादा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींसाठी लागू आहे. मात्र, निर्देश जारी झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत भुसावळमध्ये हजारो हरकती दाखल झाल्या. एकाच व्यक्तीच्या नावाने १२ ते २० वेगवेगळ्या मतदार यादी भागांतील मतदारांविरोधात हरकती दाखल झाल्या आहेत. अर्जदार ग्रामीण भागातील असताना त्यांच्या नावाने अन्य भागांतील मतदारांविरोधात हरकती नोंदविण्यात आल्या. अनेक ठिकाणी नेमक्या २० किंवा २५ हरकतींचे एकसारखे गड्ढे आढळले. उपलब्ध अर्जावर तीन ते चार वेगवेगळी हस्ताक्षरे आणि वेगवेगळ्या शाईचा वापर झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाचे निर्देश, लोकप्रतिनिधित्व अधिनियम आणि फौजदारी कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या लाल बाबू हुसेन विरुद्ध मतदार नोंदणी अधिकारी या १९९५ मधील निकालाचा संदर्भ देत, नोटीस आणि म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय ठोस पुराव्याअभावी मतदाराचे नाव वगळता येत नसल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे.



