भुसावळ (प्रतिनिधी )- सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. मात्र शहरातून थेट आपल्या गावाकडे येऊन रावेर येथे हाताचे यशस्वी ऑपरेशन करून घेण्याचा विश्वासपूर्ण अनुभव नेहेता (ता. रावेर, जि. जळगाव) येथील रहिवासी तथा सध्या सुरत येथे वास्तव्यास असलेले श्री. विनोद बाबुराव जुंभळे यांना आला आहे. समर्थ हॉस्पिटल, रावेर येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भगवान कुयटे यांनी अत्यंत कुशलतेने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून ती यशस्वी केली. या यशस्वी उपचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. भगवान कुयटे व त्यांच्या पत्नी डॉ. सुचिता कुयटे यांच्यासह वैद्यकीय पथकाचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री. विनोद जुंभळे यांना हाताच्या शस्त्रक्रियेसाठी भुसावळ, जळगाव आणि सुरत येथील डॉक्टरांनी पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, डॉ. भगवान कुयटे यांच्या वैद्यकीय कौशल्यावर आणि उपचारपद्धतीवर विश्वास ठेवून त्यांनी सुरत येथून थेट रावेर गाठले. समर्थ हॉस्पिटल येथे दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. कुयटे यांनी यशस्वीरीत्या ऑपरेशन पार पाडले असून, सध्या विनोद जुंभळे यांची प्रकृती उत्तम आहे. ग्रामीण भागातही दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याचा विश्वास या अनुभवातून अधोरेखित झाला आहे. ### सामाजिक बांधिलकीतून सातत्यपूर्ण मोफत रुग्णसेवा डॉ. भगवान कुयटे हे वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकीही जपत आहेत. स्व. लीलाबाई राजाराम कुयटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या ११ वर्षांपासून दर महिन्याच्या २१ तारखेला गरजू रुग्णांसाठी मोफत तपासणी सेवा दिली जाते. त्याचप्रमाणे डॉ. सुचिता कुयटे या आपले वडील स्व. शंकरराव कांडळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत रुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन करतात. या उपक्रमांच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळत आहे. रुग्णसेवेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत डॉ. भगवान कुयटे यांना २०१८ मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रीय एकता परिषदेतर्फे 'मेडिकल एक्सलन्स पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. ### जुंभळे परिवारातर्फे कृतज्ञतापूर्वक गौरव यशस्वी शस्त्रक्रिया आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवेमुळे भारावून गेलेल्या जुंभळे परिवाराने १८ नोव्हेंबर रोजी सत्कार समारंभाचे आयोजन केले. यावेळी डॉ. भगवान कुयटे, त्यांच्या पत्नी डॉ. सुचिता कुयटे, भूलतज्ज्ञ डॉ. निलेश पाटील, श्री. दीपक सावळे तसेच समर्थ हॉस्पिटलमधील संपूर्ण कर्मचारीवृंद यांचा सन्मान करण्यात आला. भोळे कॉलेज, भुसावळ येथील प्रा. डॉ. अनिल सावळे व त्यांच्या पत्नी सौ. वैशाली सावळे, श्री. विनोद बाबुराव जुंभळे व त्यांच्या पत्नी सौ. संगीता जुंभळे, संपूर्ण जुंभळे परिवार आणि त्यांचे परममित्र सावदा येथील श्री. सुनीलभाऊ चौधरी यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विनोद जुंभळे यांची मुले कु. नेहा जुंभळे व कुणाल जुंभळे, बहीण सौ. कुसुम लक्ष्मण अहिरे, मेहुणे श्री. लक्ष्मण झगडू अहिरे, सौ. पर्वताबाई रमेश वाघ, सौ. नंदा एकनाथ सोनवणे, भाचे प्रवीण अहिरे, पंकज अहिरे, पूर्वेश सोनवणे, भाचे जावई सचिन समाधान चऱ्हाटे, एकनाथ वाघ, विशाल तायडे, दिलीप सुधाकर सोनवणे, श्री. जितेंद्र काटे, श्री. नगीनदास वाघ, श्री. अमोल यशवंत वाघ तसेच तांदलवाडीचे पोलीस पाटील जगदीश नमायते यांच्यासह नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सत्कार सोहळ्यातून डॉक्टरांच्या वैद्यकीय कौशल्यासोबतच त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करण्यात आला. शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही ग्रामीण भागातील तज्ज्ञ डॉक्टरांवर विश्वास ठेवून यशस्वी उपचार मिळाल्याचा विनोद जुंभळे यांचा अनुभव परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



