डी. एल. हिंदी हायस्कूलमध्ये ५३ वर्षांनंतर पुन्हा भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा!स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींना उजाळा; गुरुजन आणि वर्गमित्रांच्या भेटीने भावूक झाले विद्यार्थी ;


भुसावळ (प्रतिनिधी) : येथील डी. एल. हिंदी हायस्कूलमध्ये तब्बल ५३ वर्षांनंतर सन १९७३-७४-७५ च्या तुकडीतील माजी विद्यार्थ्यांची शाळा पुन्हा एकदा भरली. रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनामुळे शाळेच्या परिसरात जुन्या आठवणींचा, मैत्रीचा आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, तर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही जुन्या आठवणींनी गहिवरून आले होते.

पुणे, इटारसी, अहमदाबाद यांसारख्या विविध शहरांतून माजी विद्यार्थी विशेषतः या स्नेहमेळाव्यासाठी भुसावळात दाखल झाले होते. तब्बल पाच दशकांनंतर आपल्या जुन्या वर्गमित्रांना आणि शिक्षकांना भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. शाळेच्या वर्गखोल्या, मैदान आणि परिसर पाहताना शालेय जीवनातील गमतीजमती, मित्रांसोबत घालवलेले क्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. जणू काळ मागे फिरल्याचा अनुभव उपस्थितांना आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित गुरुजनांचा शाल, गुलाबपुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सहभागी माजी विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या शालेय आठवणींना उजाळा देण्यात आला.

या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी हिंदी सेवा मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडियाले होते. यावेळी शाळेचे माजी प्राचार्य बी. एस. चोरडिया, शिक्षक वाय. सी. वारके, ओ. सी. अरोरा यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. शाळेतील शिस्त, शिक्षकांचे संस्कार, मित्रांसोबतचे अनुभव आणि शाळेने घडविलेल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास याविषयी त्यांनी भावना व्यक्त केल्या. आयुष्यातील अनेक टप्पे पार करताना शाळेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि गुरुजनांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याची भावना व्यक्त करत सर्वांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

५३ वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटूनही मैत्रीचा धागा कायम असल्याचे या स्नेहसंमेलनातून प्रकर्षाने जाणवले. वयाची वर्षे वाढली, प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात स्थिरावला; मात्र शाळेच्या आठवणींनी सर्वांना पुन्हा एकदा बालपणात नेले. जुन्या मित्रांच्या भेटी, हास्यविनोद, आठवणींची देवाणघेवाण आणि गुरुजनांप्रती आदरभाव यामुळे हा स्नेहमेळावा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रघुनाथ कश्यप व डॉ. भुवनेशदत्त गौर यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी अनवर खान, सुरेश साहू, कुंजविहारी रावत आणि राजकुमार कश्यप यांनी विशेष परिश्रम घेतले.