सुनसगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात १०० टक्के अनुदानावर वैरण बियाण्यांचे वाटप ! मका, ज्वारी व न्युट्रीफीड बियाण्यांचा शेतकऱ्यांना लाभ; बेलव्हाळ, गोंभी व सुनसगाव येथील शेतकऱ्यांची उपस्थिती ;

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुनसगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानावर वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये मका, ज्वारी आणि न्युट्रीफीड या बियाण्यांचा समावेश होता. या उपक्रमामुळे पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांसाठी पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाला विशेष महत्त्व आहे. मात्र, अनेकदा जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात चारा पिकांची लागवड करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याची संधी मिळणार आहे.

या बियाणे वाटपप्रसंगी बेलव्हाळ, गोंभी व सुनसगाव येथील शेतकरी उपस्थित होते. पशुवैद्यकीय अधिकारी सचिन जामरीया यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव भालचंद्र पाटील, सुनसगावचे उपसरपंच एकनाथ सपकाळे, सदस्य चंद्रकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते भोजराज कोळी, राहुल नारखेडे, सागर शिरसाळे, जितेंद्र काटे तसेच बेलव्हाळ येथील ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे उपलब्ध झाल्याने पशुपालन व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होणार असून, या उपक्रमाचे उपस्थित शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.