काळीज पिळवटून टाकणारी घटना;तुटलेल्या विजेच्या तारेने घेतला मायलेकाचा बळी ;

जळगाव (प्रतिनिधी )- शहरातील असोदा रोड परिसरात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. घराबाहेर तुटून पडलेली वीजेची तार बाजूला करण्याचा प्रयत्न करताना आई आणि मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल राजू सपकाळे, वय ३५, आणि सुनंदा राजू सपकाळे, वय ५५, अशी मृत आई आणि मुलाची नावे आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, घराबाहेर वीजेची तार तुटून पडली होती. ही तार बाजूला करण्यासाठी राहुल गेला असता त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. आपल्या मुलाला विजेचा धक्का बसल्याचे पाहून आई सुनंदा यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर दोघांचेही मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. ही बातमी समजताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात मोठी गर्दी केली. आई आणि मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.