दिवाळीच्या चार दिवसांत भुसावळ आगाराची ५१.८६ लाखांची कमाई! ७३ हजार ९१६ किलोमीटरचा प्रवास; सणासुदीच्या गर्दीत लालपरीला प्रवाशांची पसंती

भुसावळ(प्रतिनिधी ) -दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढलेली गर्दी भुसावळ एसटी आगाराच्या उत्पन्नवाढीसाठी फायदेशीर ठरली आहे. गावी जाणारे नागरिक, माहेरी जाणाऱ्या बहिणी, सुट्ट्यांचा आनंद घेणारी कुटुंबे तसेच नोकरदारांच्या परतीच्या प्रवासामुळे एसटी बससेवेला मोठा प्रतिसाद मिळाला. १० ते १३ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत भुसावळ आगाराच्या बसगाड्यांनी तब्बल ७३ हजार ९१६ किलोमीटरचा प्रवास करीत ५१ लाख ८६ हजार ३१२ रुपयांचे उत्पन्न मिळविले. सणासुदीच्या काळात आगाराने केलेली ही कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.

आगाराने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या चार दिवसांत विनासवलत प्रवासातून २९ लाख ७३ हजार ६१३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. विनासवलत ईपीकेएम (प्रति किलोमीटर उत्पन्न) ४०.२२ इतका राहिला. विविध प्रवासी सवलतींसह एकूण उत्पन्नाचा आकडा ५१ लाख ८६ हजार ३१२ रुपयांवर पोहोचला. या कालावधीत बसगाड्यांनी दररोज सरासरी १८ हजार ४७९ किलोमीटरचा प्रवास केला, तर दररोजचे सरासरी उत्पन्न सुमारे १२ लाख ९६ हजार रुपये राहिले.

 गर्दीच्या काळात लालपरीला पसंती

दिवाळीच्या सुट्ट्या आणि भाऊबीजेच्या निमित्ताने भुसावळ बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांनी एसटीच्या सेवेला पसंती दिली. ग्रामीण भागाला जोडणारी आणि तुलनेने परवडणारी सेवा असल्याने लालपरीवरील प्रवाशांचा विश्वास कायम असल्याचे या उत्पन्नाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
 प्रवासी सवलतींचाही उत्पन्नवाढीत वाटा

महिला सन्मान योजनेसह शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेत मोठ्या संख्येने नागरिकांनी एसटीने प्रवास केला. त्यामुळे प्रवासी सवलतींचा लाभ देऊनही आगाराच्या एकूण उत्पन्नाने ५१.८६ लाखांचा टप्पा गाठला. प्रवाशांना सवलतींचा लाभ मिळण्यासोबतच एसटीच्या प्रवासी सेवेलाही सणासुदीच्या काळात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.