भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या वतीने भारतीय सिंधू सभा, भुसावळ यांच्या सहकार्याने बालदिनाचे औचित्य साधून ‘सिंधी बारां जी मोज’ या विशेष बालसांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कविता, कथा आणि गीत गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये ४२ बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सुंदर सादरीकरण केले. सिंधी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेची गोडी लागावी, हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश होता. बालकांनी कविता, कथा आणि गीतांच्या माध्यमातून आपल्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडविले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या पहिल्या सहा विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या वतीने प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, मुंबईचे श्री. सौरव सिंधे, प्रतिष्ठा महीला मंडळ अध्यक्षा सौ रजनी संजय सावकारे, प्र.नगराध्यक्षा श्रीमती शैलजा नारखेडे, श्री. राजेंद्र कानडे, पूज्य बाबा सुनील कुमारजी, नगरसेविका निक्की बत्रा आणि श्री दिनेश दोदानी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून . श्री दिनेश दोदानी यांनी जबाबदारी सांभाळली, तर सूत्रसंचालन श्री. सनी रामानी यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण कार्यक्रमाला सुमारे ४०० नागरिकांची उपस्थिती लाभली. बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच सिंधी भाषा आणि संस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.



