भुसावळ (प्रतिनिधी) : ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने महिला क्रीडा मंडळ, भुसावळतर्फे तालुक्यातील मांडवेदिगर येथील नालंदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक व प्राथमिक आश्रमशाळेला २ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व स्टॅन्ड भेट देण्यात आले. महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांच्या पुढाकाराने, प्रकल्प प्रमुख विनिता नेवे यांच्या नियोजनातून तसेच सचिव लता होस्कोटे, उपाध्यक्षा स्वाती नाईक आणि माजी अध्यक्षा प्रभा पाटील यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी ही मूलभूत गरज असून, शाळांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी महिला क्रीडा मंडळाकडून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. यावेळी अध्यक्षा आरती चौधरी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचे आरोग्य ही समाजाची जबाबदारी आहे. केवळ शिक्षण देणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी वातावरण आणि आवश्यक मूलभूत सुविधा मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महिला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्प प्रमुख विनिता नेवे यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे तसेच शाळेच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या गरजा, शाळेतील उपलब्ध सुविधा आणि परिसराचा विचार करून या शाळेची उपक्रमासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुंदर लोकनृत्याने झाली. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर महिला क्रीडा मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्षा लक्ष्मी मकासरे आणि महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांच्या हस्ते रिबीन कापून पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला क्रीडा मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्यासोबतच हिरवाईने नटलेले आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी महिला क्रीडा मंडळाच्या सदस्या विनिता नेवे, कावेरी चौधरी, वैशाली अनंत पाटील, जयश्री दवे, सीता राऊळ, अनिता कावडीवाले, विजया निकम उपस्थित होत्या. तसेच नालंदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रमेश मकासरे, उपाध्यक्ष लक्ष्मी मकासरे, सचिव लक्ष्मण जाधव यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीन भालेराव यांनी केले. शाळेच्या कार्याची व विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांची माहिती आबा पाटील सर यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष रमेश मकासरे यांनी महिला क्रीडा मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन राबविलेल्या या उपक्रमाबद्दल मंडळाचे आभार मानले.


