सांगली (प्रतिनिधी) : व्हॉईस ऑफ मीडियाचा जन्मच संकटातून झाला आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटातून या संघटनेची निर्मिती झाली. त्यामुळे संकटे आली की त्यातून संधी निर्माण होते. पत्रकारांनीही संकटांकडे संधी म्हणून पाहून नव्या आव्हानांना सामोरे जावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी केले. व्हॉईस ऑफ मीडिया व व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमच्या वतीने सांगली येथे संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय केडर कॅम्प उत्साहात पार पडला. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे यांसह राज्यभरातील पत्रकार व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के होते. प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, उपाध्यक्ष संगम कोटलवार, महिला आघाडीच्या राष्ट्रीय संघटक रश्मी मारवाडे, प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील तसेच व्याख्याते अभय भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती. केडर कॅम्पचे उद्घाटन सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते झाले. प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी पत्रकारांच्या आरोग्य व कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडला. पत्रकारांनी आरोग्य विमा उतरविणे गरजेचे असून, आकस्मिक निधन किंवा अपघाताच्या प्रसंगी पत्रकारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी संघटनेने प्रभावीपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर शैक्षणिक किटचे वाटप केले जाते. पत्रकारांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याबरोबरच निर्भय पत्रकारितेसाठी प्रशिक्षण देणे हा केडर कॅम्पचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, लोकशाही टिकविण्यात पत्रकारितेचा मोठा वाटा आहे. देशाला प्रदीर्घ व प्रखर पत्रकारितेचा वारसा लाभला आहे. मात्र, वर्तमानपत्रांपासून इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया आणि विविध न्यूज चॅनेल्सपर्यंत पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. या बदलत्या परिस्थितीत पत्रकारितेची विश्वासार्हता जपणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांना प्रशिक्षित करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया घेत असलेले केडर कॅम्प उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले की, पत्रकार तळागाळातील नागरिकांचा आवाज शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. चुकीला चूक आणि योग्य गोष्टीला योग्य म्हणताना समतोल राखणे आवश्यक आहे. पत्रकार सर्वांचा आवाज ऐकतात; मात्र पत्रकारांचा आवाज कोण ऐकणार, यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया कार्यरत आहे, ही कौतुकाची बाब आहे. पत्रकार, त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, कुटुंब आणि पेन्शन या पंचसूत्रीवर संघटना काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पत्रकारांना मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी पत्रकारितेसमोरील विविध आव्हानांवर भाष्य केले. व्हॉईस ऑफ मीडियाची जिल्हा व तालुकास्तरावर मजबूत संघटनात्मक बांधणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संघटनेसाठी पारदर्शक व वैध मार्गाने निधी उभारून त्यातून पत्रकारांच्या कल्याणकारी योजना राबवाव्यात, आरोग्य विमा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, यासाठी पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली असल्याचे मस्के यांनी सांगितले. पत्रकार केवळ पत्रकारितेवर अवलंबून न राहता अन्य व्यवसायाच्या माध्यमातूनही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर व्याख्याते अभय भंडारी यांनी ‘पत्रकारिता आणि समाज’ या विषयावर मार्गदर्शन केले. व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष संगम कोटलवार, महिला आघाडीच्या राष्ट्रीय संघटक रश्मी मारवाडे, प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील, राज्य सरचिटणीस तथा विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सांगलीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष अनिल करंदकर, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील कांबळे, पुण्याचे जिल्हाध्यक्ष अझहर कादरी, सोलापूर महानगरचे अध्यक्ष धनराज बागले, राज्य सहसरचिटणीस दीपक ढवळे, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष गणेश आवळे, सरचिटणीस अल्ताफ खतीब, नित्यानंद कुंभार, जे. वाय. पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे यांनी केले. प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते यांनी केले, तर आभार अल्ताफ खतीब यांनी मानले.


