भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात बाजारपेठ पोलिसांनी धाडसी कारवाई करत अनेक जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांत हवा असलेला कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला अटक केली आहे. या कारवाईमुळे राज्यभरातील अनेक प्रलंबित गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सादिक अली हा महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फरार होता. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीच्या ठिकाणाबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. तो बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातही अनेक दिवसांपासून फरार होता.
तपासा दरम्यान उघडकीस आले की, आरोपीने जळगाव जिल्ह्यासह चाळीसगाव, वर्धा, बुलढाणा (शेगाव, नांदुरा, खामगाव), धुळे आणि संभाजीनगर आदी भागांत चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे केले आहेत. त्यामुळे तो अनेक जिल्ह्यांमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हणून शोधात होता.
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर आढाले, चंद्रकांत रायपूरकर, कोतकर आणि जीवन कपडे यांचा समावेश होता.
दरम्यान, या अटकेमुळे चैन स्नॅचिंगच्या इतर अनेक गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


