एक लाखाची लाच भोवली: जळगाव शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलिस एसीबीच्या जाळ्यात :

जळगाव, (प्रतिनिधी ) : जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनमधील एका पोलीस नाईकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली.

विनोद पितांबर अहिरे (वय ४०) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने एका तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल झालेल्या अर्जाची चौकशी अहिरे यांच्याकडे होती. या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपीने तब्बल २ लाख रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने याबाबत तत्काळ ला.प्र.वि. जळगाव कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर १३ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. पडताळणी दरम्यान आरोपीने पंचांसमक्ष लाच मागणीची पुष्टी केली. त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान तक्रारदाराने शनिपेठ पोलीस स्टेशन परिसरात आरोपीला १ लाख रुपयांची रोख रक्कम दिली. ही रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली.

या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा (गु.क्र. १२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वात पार पडली. सापळा पथकात पोउपनिरीक्षक सुरेश पाटील, संगिता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे आणि अमोल भुसवंशी यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.

दरम्यान, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा किंवा संबंधित कार्यालयाशी कळवावे. भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेअंतर्गत अशा तक्रारींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागाने दिला आहे.