भुसावळ – मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणार्या अभियंता दिनाच्या निमित्ताने श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एड्युकेशनच्या स्थानीय शाखे द्वारे अभियंता दिवस साजरा केला गेला.

कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, अधिष्ठाता डॉ.आर.बी.बारजिभे, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एड्युकेशन प्रमुख डॉ. एस.बी.ओझा, विभागप्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ. पंकज भंगाळे, प्रा. ए.पी.चौधरी ,डॉ.डि.डि.पाटील, प्रा.पी.एस.बजाज, प्रा.डी.जी. अग्रवाल,प्रा.सुलभा शिंदे, प्रा.जी.सी.जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी अभियंत्यांचे महत्व विषद केले.”सद्य परिस्थिति पाहता अभियंत्यांसमोर अनेक आव्हान असून, तंत्रज्ञानच नाही तर जैव तसेच वैद्यकीय क्षेत्रांमध्येही अभियंत्यांनी अधिक जोरकस योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले. जग बदलत आहे, प्रचंड विकासाच्या दिशेने आपली घौडदौड सुरू असून, अभियंतेच या विकासाच्या मागे आहेत. आजच्या बहुसंख्य सेवा आणि उत्पादनांमध्ये अभियांत्रिकीचा काही घटक त्यांच्या निर्मिती संकल्पनेत कमी अधिक प्रमाणात गुंतलेला होता, ज्यामुळे समाजातील लोकांसाठी आधुनिक वस्तूंच्या वापरातून दीर्घ, परिपूर्ण आणि निरोगी जीवनाचा मार्ग मोकळा झाला” असे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी यांनी सांगितले.
“प्रगत तांत्रिक जगात, कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जगाला अभियंत्यांची गरज असते. गणित आणि विज्ञानाची तत्वे लागू करून, अभियंते जगातील सर्वात मोठ्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करतात. ह्या क्षेत्रात शैक्षणिक, वैज्ञानिक, संशोधन आणि व्यावसायिक ह्या पातळीवर एक ठराविक गंभीरता आवश्यक आहे, जेणेकरून अभियंते खरोखर बदल घडवून आणणारे योगदान देऊ शकतील” असे अधिष्ठाता डॉ.आर.बी.बारजिभे यांनी सांगितले. “अभियंते हे गंभीर तर असले पाहिजेच पण त्याहून महत्वाचे म्हणजे त्यांनी सर्जनशील, उत्सुक तसेच सामाजिक गरजा/बदल जाणण्यासाठी व तांत्रिक बदल आत्मसात करण्यासाठी कधीही सक्षम असणे अत्यंत आवश्यक ठरते तरच अभियंते सतत बदलणारे तंत्रज्ञान हाताळण्यास तयार होत जग बदलवतात ही शिकवणूक अभियंत्यांनी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनातून घेतली पाहिजे ” अशी अपेक्षाही डॉ.आर.बी.बारजिभे यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी, सत्यनारायण गोडयाले, रमेश नागराणी तसेच इतर पदाधिकार्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.


