भुसावळ : पालिकेने शहरात 12 कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू केली असून मंजूर रस्त्यांपैकी 55 टक्के कामे झाली असून त्यातही केवळ डांबरीकरण (बीबीएम) झाले. सीलकोट व कारपेटची कामे रेंगाळली आहेत. आता याच रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पालिका प्रशासनाचे दूरध्वनीवरून कान टोचले आहेत. भुसावळातील रस्त्यांचा सत्यानाश थांबवा, असे पालकमंत्री म्हटल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

रस्त्यांच्या दुर्दशेवरून पालकमंत्री संतप्त : म्हणाले ; रस्त्यांचा सत्यानाश थांबवा
शहरातील रस्त्यांचे बीबीएम झाले मात्र अद्याप सिलकोट व कारपेटचा पत्ता नाही. नवीन मंजुरी मिळालेल्या रस्त्यांच्या कामाला गती नाही. याबाबत तक्रारी प्राप्त होताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना संपर्क साधून भुसावळच्या रस्त्यांचा सत्यानाश थांबवा, अशा सूचना केल्या. शहरात पालिकेने 12 कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरु केली खरी पण अद्यापही एकाही प्रमुख रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. बीबीएमवर गाडे अडकले आहे. इतर योजनांमधून मंजूर रस्ते कामांना सुरूवात नाही. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी मुख्याधिकारी चिद्रवार यांना संपर्क करून शहरातील खड्डे पडलेल्या रस्त्यांची यादी वाचून दाखवली. बीबीएम झालेल्या या रस्त्यांवर सिलकोट, कारपेटची कामे करा. अन्यथा भुसावळातील रस्त्यांचा सत्यानाश होईल, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.
भुसावळ शहर आक्रोश मोर्चाने दणाणले
भुसावळातील रस्ते हरवले खड्ड्यात
अमृत योजनेमुळे रखडलेल्या रस्ते कामांना 12 कोटी रुपये निधीतून सहा महिन्यांपूर्वी सुरूवात झाली. पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे गरजेचे होते. पण, पालिकेच्या दुर्लक्षामुळे जामनेर रोड, बाजारपेठ पोलिस ठाणे ते हंबर्डीकर चौक, गांधी पुतळा ते जुने प्रांत कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते रजा चौक, यापुढील खडका चौफुलीपर्यंतचा रस्ता, जळगाव रोडवरील लोणारी हॉल ते वाय पॉइंटपर्यंत, सतारे चौक ते टेक्निकल हायस्कूल, मुख्य बाजारपेठेतील सर्व रस्ते खड्ड्यांत हरवले आहेत.
स्टेशन रोडचा तिढा सुटणार कधी?
भुसावळ शहरातील स्टेशन रोडचा प्रश्न बिकट आहे. अवघ्या अर्धा किमीचा रस्ता दुरुस्तीबाबत रेल्वे व पालिकेने हात वर केले आहेत. खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांनी यांनी रेल्वे अधिकार्यांसोबत बैठक घेत रस्ता दुरुस्तीची सूचना केली पण अधिकार्यांनी जुमानलेले नाही. रेल्वे व पालिका प्रशासनाने तातडीने या संदर्भात बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


