व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याला होकार!; भुसावळात विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती भुसावळ दि, 20 सप्टेंबर; आजच्या तरुण पिढीसमोर व्यसनाधीनतेचे वाढते आव्हान लक्षात घेता, विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सकारात्मक आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन समुपदेशक आरती चौधरी यांनी केले. इनरव्हील क्लब भुसावळ रेल सिटी तर्फे शिवाजी नगर येथील डीएल हिंदी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आरती चौधरी यांनी व्यसनांचे दुष्परिणाम, त्यामागील कारणे आणि व्यसनापासून दूर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. व्यसनाची सुरुवात अनेकदा केवळ कुतूहल, मित्रांचा आग्रह किंवा चुकीच्या संगतीतून होते. सुरुवातीला सहज वाटणारी ही सवय पुढे गंभीर व्यसनाचे रूप धारण करू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य संगत निवडणे, चुकीच्या दबावाला बळी न पडणे आणि कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला ठामपणे नकार देणे आवश्यक असल्याचे चौधरी यांनी सांगितले. व्यसनाधीनतेचा परिणाम केवळ व्यक्तीच्या आरोग्यावर होत नाही, तर त्याचा शिक्षण, कौटुंबिक वातावरण, मानसिक व सामाजिक जीवन तसेच भविष्यातील प्रगतीवरही परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारावी. तसेच स्वतः व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच मित्र-मैत्रिणींनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी इनरव्हील क्लब भुसावळ रेल सिटी च्या अध्यक्षा योगिता वायकोळे यांनी क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे हा अशा उपक्रमांचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मार्गदर्शन सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यसनांशी संबंधित विविध प्रश्न विचारले. समुपदेशकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शनपर उत्तरे देत व्यसनमुक्त जीवनासाठी सकारात्मक विचार, योग्य संगत आणि आत्मविश्वासाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी “व्यसनाला नकार आणि निरोगी जीवनाला होकार” देण्याचा सामूहिक संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचला. यावेळी इनरव्हील क्लब भुसावळ रेल सिटी च्या अध्यक्षा योगिता वायकोळे, सचिव कविता पाचापांडे, अनिता महाजन, हेमलता सोनार, अंजली जोशी, आदिती भडंग आदी सदस्य उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य टेंभुर्णीकर सर, शिल्पा भुता मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


