भुसावळ (प्रतिनिधी ) - जळगाव येथील छत्रपती जलतरण तलावात आयोजित करण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत भुसावळच्या जे अँड डी स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. विविध वयोगटांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई करत अकादमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. नऊ वर्षांखालील मुलांच्या गटात चिन्मय स्वप्नील पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. याच वयोगटातील मुलींच्या गटात सानवी मुळे हिनेही दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. तर लहान गटातील स्पर्धेत देवांश पाटील याने तृतीय क्रमांक, तर आरवी वाघ हिने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांच्या कामगिरीमुळे जे अँड डी स्पोर्ट्स अकादमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशासाठी विद्यार्थ्यांना जे अँड डी स्पोर्ट्स अकादमीचे जलतरण प्रशिक्षक अक्षय कोळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, योग्य तंत्र, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जे अँड डी स्पोर्ट्स अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसह पालक, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी सर्व यशस्वी जलतरणपटूंचे अभिनंदन केले असून, भविष्यातही त्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भुसावळचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


