भुसावळात रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३२ शेतकऱ्यांचा सहभाग

भुसावळ ( प्रतिनिधी )- 
कृषी विभाग भुसावळ व रोटरी क्लब ऑफ रेलसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे रानभाजी महोत्सवाचे आयोजन रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी न्यू म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे करण्यात आले. सकाळी १० वाजता मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रारंभी रोटरीचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील (सोनू) मांडे यांनी उपस्थित मान्यवर, नागरिक व शेतकऱ्यांचे स्वागत करून रानभाजी महोत्सवाचे महत्त्व व उद्दिष्टे स्पष्ट केली. यावेळी मंत्री संजय सावकारे यांनी मार्गदर्शन करताना रानभाज्यांचे औषधी गुणधर्म, मानवी आरोग्यासाठी असलेले महत्त्व तसेच त्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांची माहिती दिली.

कृषी विभागातील आत्माचे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांनी विविध रानभाज्यांची माहिती देत त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पाककृतींच्या स्टॉलविषयी मार्गदर्शन केले.

या महोत्सवात भुसावळ तालुका व परिसरातील ३२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. रानमाळ, जंगल परिसर तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल शेतकऱ्यांनी लावले होते. तसेच कृषी गटातील महिलांनी रानभाज्यांपासून तयार केलेले ढिढरे, पराठे, भेडके, कढी, चटणी, कोशिंबीर आणि विविध प्रकारची पेये विक्रीसाठी उपलब्ध करून दिली.

महोत्सवाला भुसावळकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध रानभाज्यांची खरेदी केली. तसेच रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी ऋषीकेश चौधरी, आत्माचे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव, मंडळ कृषी अधिकारी मनोज शिंदे, रोटरी क्लब ऑफ रेलसिटीचे अध्यक्ष सुयश न्याती, सचिव डॉ. राहुल पांडे, प्रोजेक्ट ऑफिसर सुनील मांडे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.