प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी, मध्य रेल्वेने सर्व विभागांमध्ये'नॉन-फेअर रेव्हेन्यू' अंतर्गत स्थानकांवर आणि रेल्वे परिसरात किराणा किऑस्कसाठी कंत्राटे दिली आहेत. 'विशेष स्वच्छता मोहीम ६.०' चा भाग म्हणून आणि सर्व ठिकाणी एकसमानता सुनिश्चित करण्यासाठी, मध्य रेल्वेने अशा किराणा स्टॉल्सवर विक्रीसाठी अनुमत (परवानगी असलेल्या) आणि अननुमत (परवानगी नसलेल्या) वस्तूंच्या यादीचे प्रमाणीकरण केले आहे. *विक्रीसाठी अनुमत असलेल्या वस्तू खालीलप्रमाणे आहेत:* - अ) जीवनावश्यक खाद्यपदार्थ (स्टेप्लस) - तांदूळ, गहू व इतर धान्ये, पीठ, कडधान्ये व डाळी, खाद्यतेल, साखर, गूळ, मीठ, मसाले, सुका मेवा आणि नट्स. ब) पेये - रेल्वेद्वारे मान्यताप्राप्त ब्रँड्सचे पॅकबंद पिण्याचे पाणी, ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स, शीतपेये (सॉफ्ट ड्रिंक्स) इत्यादी. क) स्नॅक्स आणि पॅकबंद खाद्यपदार्थ - बिस्किटे, पॉपकॉर्न, चिप्स यांसारखे पॅकबंद खाद्यपदार्थ, इन्स्टंट नूडल्स, 'रेडी-टू-ईट' (तयार) खाद्यपदार्थ, सॉस, जॅम, लोणची. ड) दुग्धजन्य आणि बेकरी उत्पादने - दुग्धजन्य पदार्थ आणि बेकरी उत्पादने. इ) गोठवलेले (फ्रोजन) आणि शीतगृहात ठेवण्यायोग्य पदार्थ - 'रेडी-टू-कुक' (शिजवण्यास तयार) स्नॅक्स (उदा. पराठे, कटलेट, नगेट्स), आइस्क्रीम (मध्यम आकाराच्या फ्रीझरमध्ये ठेवलेले). फ) वैयक्तिक काळजी आणि स्वच्छताविषयक आवश्यक वस्तू - साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, डिटर्जंट यांसारख्या प्रसाधने आणि टिश्यू पेपर, नॅपकिन्स, टॉयलेट पेपर इत्यादी. ग) इतर आवश्यक वस्तू - बालकांसाठी उत्पादने (डायपर, लहान मुलांचे अन्न, वाईप्स), पाळीव प्राण्यांचे अन्न व निगा राखण्यासाठीच्या वस्तू, स्टेशनरी आणि दैनंदिन वापराच्या लहान वस्तू. *खालील वस्तूंच्या विक्रीस परवानगी नाही:-* • ग्रोसरी किओस्कवर (किराणा स्टॉल्सवर) शिजवलेले अन्नपदार्थ, चहा आणि कॉफी विकण्यास परवानगी नाही. *इतर अटी:* • भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणा (एफएसएसएआय) च्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. • स्टॉलच्या आत आणि परिसरात स्वच्छता राखणे. • स्टॉलच्या सुमारे १ मीटर परिघात कचऱ्याच्या पिशव्यांसह (गार्बेज बॅग्स) कचरापेट्या उपलब्ध करून देणे. या उपक्रमामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान दर्जेदार दैनंदिन आवश्यक वस्तू, ब्रँडेड उत्पादने आणि घरगुती वस्तू वाजवी दरात सहज उपलब्ध होतील. त्याचबरोबर, सर्व स्थानकांवर स्वच्छता आणि एकसमानता राखली जाईल. कोणत्या वस्तूंची विक्री करण्यास परवानगी आहे आणि कोणत्या वस्तू प्रतिबंधित आहेत, हे स्पष्टपणे निश्चित करून, मध्य रेल्वे प्रवाशांची सोय वाढवण्याचा, अनधिकृत विक्रीला प्रतिबंध करण्याचा आणि पारदर्शक व प्रवासी-स्नेही व्यावसायिक सुविधांच्या माध्यमातून 'नॉन-फेअर रेव्हेन्यू' बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे.


