भारतीय बौद्ध महासभेच्या रांजणी येथील ग्राम शाखा उद्घाटन व फलक अनावरण उत्साहात ;

रांजणी, ता. जामनेर, जि. जळगाव – भारतीय बौद्ध महासभेच्या (The Buddhist Society of India) वतीने ग्रामीण स्तरावर धम्मप्रसाराच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल उचलत दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पावन प्रसंगी रांजणी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या ग्राम शाखेचे उद्घाटन व फलक अनावरण मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या या राष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या मिशन २०२५ अंतर्गत प्रत्येक तालुक्यात ५६ ग्राम शाखा स्थापन करण्याच्या उद्दिष्टाचा हा एक महत्त्वाचा भाग होता. केंद्रीय कार्यालयाच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा पूर्व शाखा व जामनेर तालुका शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला जिल्हासह राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे स्वरूप:
सर्वप्रथम रांजणी येथील बुद्ध विहारात बौद्ध धम्माच्या विनयानुसार महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक त्रिशरण व पंचशील स्वीकारण्यात आले. या धम्मिक कार्यक्रमास उपासक-उपासिकांची मोठी उपस्थिती होती.

फलक अनावरण:
जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुमंगलजी तथा रविंद्र अहिरे गुरुजी यांच्या हस्ते नव्याने स्थापन झालेल्या रांजणी ग्राम शाखेच्या फलकाचे अनावरण व उद्घाटन करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन:
या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन सचिव डॉ. के.वाय. सुरवाडे गुरुजी, जिल्हाध्यक्ष रविंद्र अहिरे गुरुजी, जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे, जिल्हा कोषाध्यक्ष . डॉ. प्रा. संजीव साळवे सर, जिल्हा पर्यटन सचिव आद. वसंतदादा लोखंडे, जिल्हा संघटक व जामनेर प्रभारी आद. ए.टी. सुरळकर आदींनी आपल्या मार्गदर्शनातून धम्मकार्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष चंद्रकांत इंगळे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गावोगावी धम्म शाखा उभारण्याच्या महत्त्वावर भर दिला.

नवनियुक्त ग्राम शाखा कार्यकारिणी:
ग्राम शाखेच्या कार्यकारिणीची घोषणा खालीलप्रमाणे करण्यात आली:

· अध्यक्ष: गजानन पानपाटील
· सरचिटणीस: भारत सुरडकर
· कोषाध्यक्ष: ऋतिक मगरे
· उपाध्यक्ष: बारसु सपकाळे, प्रकाश सुरडकर, नंदू प्रधान
· हिशोब तपासणीस: अनिल मगरे
· कार्य. सचिव: विनोद मगरे
· संस्कार सचिव: संतोष सुरडकर, शांताराम मगरे
· सचिव संरक्षण: प्रेम सपकाळे, समाधान मगरे, जितेंद्र वाघ, बाबुराव रसाळे
· सचिव पर्यटन: अजय मगरे, सिद्धार्थ सुरडकर

तसेच अनेक सभासदांना संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन:
सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका सचिव (संस्कार) अर्जुन मगरे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘सरणंत्तय’ (शांतीपाठ) घेऊन समारोप करण्यात आला.

उपस्थित मान्यवर व समता सैनिक:
यावेळी जिल्हा शाखेचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल रमेश साळवे, महिला संस्कार सचिव छायाताई सुरवाडे, जिल्हा संघटक रंजीताई ठाकरे, तालुका महिला अध्यक्ष मनिषाताई वसंतदादा लोखंडे, तालुका सरचिटणीस दशरथ संध्यान, कोषाध्यक्ष एस.के. सुरवाडे, कार्य. सचिव मुकुंद सोमवंशी, महिला शाखा करुणाताई म्हस्के, भाऊराव तायडे, माणिकराव लोखंडे, युवराज अहिरे, रमेश सुरवाडे, अर्जुन मगरे, मुकेश दामोदर, काशिनाथ गायकवाड, अनिल मस्के, पत्रकार संजय निकम, अरुण अहिरे आदींसह जामनेर तालुक्यातील व रांजणी येथील मोठ्या संख्येने समता सैनिक दलाचे सैनिक, उपासक-उपासिका व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाने धम्मप्रसाराच्या दृष्टीने एक नवी ऊर्जा निर्माण केली असून, मिशन २०२५ अंतर्गत प्रत्येक गावात शाखा व प्रत्येक घरी सैनिक असावेत, या संकल्पनेला बळकटी आली आहे. संस्थेच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास प्रवचनमालेचे आयोजन, विहारात धम्मग्रंथ वाचन, दर रविवारी विहारात जाण्याच्या संस्काराचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.

---