श्री मंगळग्रह मंदिरात भव्य नवचंडी महायागाची मंगलमय पूर्णाहुती; भाविकांची मांदियाळी ;


मंत्रोच्चार, वैदिक विधी आणि महाआरतीने आदिशक्तींचा जागर; पाच देवींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अमळनेर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य नवचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले. मंत्रोच्चार, दुर्गासप्तशतीचे पाठ, वैदिक यज्ञविधी आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्याची सायंकाळी पाच वाजता पूर्णाहुती व सामूहिक महाआरतीने मंगलमय सांगता झाली. यावेळी अमळनेरसह जळगाव, धुळे आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही नवचंडी महायागाचे दोन सत्रांत आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत धार्मिक विधी पार पडले. देवी आदिशक्तींच्या उपासनेसाठी दुर्गासप्तशतीचे पाठ, चंडीपाठ, विशेष मंत्रोच्चार आणि वैदिक यज्ञविधी करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.

विविध धार्मिक विधींनी नवचंडी यागाची सुरुवात

महायागाच्या पहिल्या सत्रात गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, सर्वतोभद्र मंडल, नवग्रह मंडल आणि रुद्र स्थापना करण्यात आली. तसेच श्री भैरवी माता व नवदुर्गांचा अभिषेक आणि अर्चन करण्यात आले.

दुसऱ्या सत्रात अग्निस्थापना, नवग्रह हवन, सप्तशती पाठाद्वारे देवींचे हवन, बलिदान आणि पूर्णाहुती असे विधी पार पडले. नवदुर्गांची कृपादृष्टी लाभावी, लक्ष्मीप्राप्ती व्हावी तसेच आयुरारोग्य उत्तम राहावे, या मंगलकामनेसह अष्टमीचे हवन करण्यात आले. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि भूमीमाता या प्रमुख देवतांवर अभिषेक करण्यात आला. यज्ञात डाळिंब, ऊस, खीर आणि पांढऱ्या तिळांची आहुती अर्पण करण्यात आली.

मान्यवर यजमानांच्या उपस्थितीत पूर्णाहुती

मुख्य यज्ञवेदीवर विशेष यजमानांच्या हस्ते मंत्रोच्चारात आहुती अर्पण करण्यात आल्या. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, सौ. आशाताई महाले यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांच्या साक्षीने सायंकाळी पाच वाजता यज्ञाची मुख्य पूर्णाहुती करण्यात आली.

त्यानंतर आदिशक्ती माता तसेच भगवान श्री कालभैरव आणि भैरवी माता यांची सामूहिक महाआरती करण्यात आली. या सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या धार्मिक विधींचे पौरोहित्य प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, यश जोशी, परशुराम शर्मा, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, तुषार दीक्षित, चंद्रकांत जोशी, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, हेमंत गोसावी आणि अनिरुद्ध कुलकर्णी यांनी केले.

पाच देवींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नवरात्रोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. श्री मंगळग्रह देवांच्या दर्शनासोबतच श्री भूमीमाता, श्री पार्वती माता, श्री अनघालक्ष्मी माता, श्री भैरवी माता आणि श्री लक्ष्मी माता या पाच देवींच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नवचंडी यागाच्या सांगतेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व विश्वस्त आणि सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.

नवरात्रोत्सवात नऊ दिवस श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन

नवरात्रोत्सवाची घटस्थापना रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवार, दि. १२ ते रविवार, दि. १८ ऑक्टोबरदरम्यान भगवान श्री कालभैरव-भैरवी माता मंदिरासमोर दररोज सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत विशेष यजमानांच्या हस्ते श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन करण्यात आले. तसेच अमळनेर शहरातील विविध महिला मंडळांच्या सदस्यांच्या शुभहस्ते नऊ दिवस दररोज सायंकाळी महाआरती करण्यात आली.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग

नवचंडी महायागासाठी विशेष यजमान म्हणून धुळे, जळगाव, अमळनेर आणि परिसरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, विधी, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले.

यामध्ये धुळे येथील उपमहापौर गजेंद्र अंपळकर व सौ. कल्याणी अंपळकर, सार्वजनिक पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र अग्रवाल व त्यांच्या पत्नी, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सयाजीराव भामरे व सौ. आश्विनी भामरे, उद्योजक अजय नाशिककर व त्यांच्या पत्नी, नाम फाऊंडेशनचे जिल्हा संयोजक प्रदीप पानपाटील व त्यांच्या पत्नी, नगरसेविका अरुण पवार व सौ. आरतीताई पवार, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पराग उपकारे व त्यांच्या पत्नी, धुळे महापालिकेचे माजी सभापती सुनील बैसाणे व त्यांच्या पत्नी, संपादक महेंद्रसिंग राजपूत व त्यांच्या पत्नी यांचा समावेश होता.

जळगाव येथील महापौर मनोज काळे व सौ. दीपमालाताई काळे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम, ॲड. केतन ढाके व त्यांच्या पत्नी, नगरसेविका भारद्वाज सपकाळे व डॉ. अमृताताई सोनवणे-सपकाळे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. जितेंद्र कोल्हे व त्यांच्या पत्नी, ॲड. प्रमोद पाटील व एनआयएफ ग्लोबल/संगीत ॲकॅडमीच्या संचालिका सौ. संगीताताई पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील व त्यांच्या पत्नी, अमळनेर येथील डॉ. जितेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी तसेच पारोळा येथील उद्योजक किरण पुंजू वाणी व त्यांच्या पत्नी यांनीही विशेष यजमान म्हणून सहभाग घेतला.

नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी धुळे महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस व त्यांच्या पत्नी, भाजपच्या बेटी बचाव-बेटी पढाव अभियानाच्या धुळे येथील अध्यक्षा सौ. अल्पाताई अनुप अग्रवाल, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र प्रकाश सोनवणे आणि धुळे महापालिकेच्या नगरसेविका सौ. वंदनाताई संजय भामरे यांनीही मंदिरात भेट दिली.

भक्ती, श्रद्धा आणि वैदिक परंपरेचा संगम ठरलेल्या या नवचंडी महायागाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाची सांगता मंगलमय वातावरणात झाली. आदिशक्तींच्या उपासनेतून सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणाची प्रार्थना करत भाविकांनी देवींचे दर्शन घेतले.