भुसावळ (प्रतिनिधी) - शहरातील वसंत टॉकीजसमोरील गट नं. १४, सीटीएस नं. ४३०० येथील प्रस्तावित शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी गंभीर तक्रार केली आहे. सदरील कामासाठी सुधारित तांत्रिक मंजुरी तसेच आरसीसी डिझाईन उपलब्ध नसतानाही ठेकेदार विलास पाटील असोसिएट्स यांच्याकडून काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात सानप यांनी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या जनसमाधान उपक्रमात तक्रार अर्ज सादर केला आहे. सदरील कामाचे कोट्यवधी रुपयांचे बिल ठेकेदाराने घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदरील तक्रारीची दखल घेण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी करून आठ दिवसांच्या आत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भविष्यात मोठ्या संख्येने व्यावसायिक तसेच ग्राहकांची वर्दळ राहणार असल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी भूमिका सानप यांनी मांडली आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत सदरील बांधकाम तात्काळ थांबवावे, तसेच आतापर्यंत झालेल्या कामाची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच प्रकरणात अनियमितता अथवा गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करून दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. चौकशीनंतर करण्यात आलेल्या कारवाईची प्रत माहितीस्तव देण्यात यावी, अशी विनंतीही केदार सानप यांनी केली आहे. या तक्रारीनंतर वसंत टॉकीजसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाबाबत प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे आता संपूर्ण भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.


