सावदा, दि. ४ : केंद्रीय राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये अश्लील, आक्षेपार्ह व मानहानीकारक वक्तव्य करण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, सावदा शहरच्या वतीने सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले की, नंदुरबार येथील विजय चौधरी या व्यक्तीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी अत्यंत अश्लील, अवमानकारक व बदनामीकारक भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य केवळ एका महिला लोकप्रतिनिधीचा अपमान नसून समाजातील महिलांच्या सन्मानावर आघात करणारे आहे. अशा विकृत प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रक्षाताई खडसे या जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याविषयी करण्यात आलेल्या अशोभनीय वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी रेणुका राजेंद्र पाटील, सारिका भरत चव्हाण, रंजना जितेंद्र भारंबे, चंपकलाल राजाराम येवले, सचिन चूडामण बेंडाळे, नकुल निलेश बेंडाळे, जयश्री अतुल मेहते, गजानन बाबूराव भारंबे, देवयानी निलेश बेंडाळे, शैलेश चंद्रकांत चौधरी, सुनीता संजय तायडे, जितेंद्र किशन भारंबे, सागर दुर्गादास चौधरी, महेश मुरलीधर बोंडे, राहुल मधुकर चौधरी, तेजेंद्र अरुण चौधरी, लतेश रमेश सरोदे, सागर नंदकुमार पाटील, शरद मनोहर कस्तुरे, मुरलीधर रविंद्र चौधरी, लतेश रविंद्र चौधरी, सोमा दिलीप पाटील, प्रदीप दिलीधर पाटील, गिरीश संजय बेंडाळे, गौरव बाबुराव सेतवाल, महेश प्रभाकर अकोले, दीपक रमेश श्रावगे, सूरज मोहन चौधरी, निलेश दिनकर फेगडे, स्वप्नील सुनील पाटील, प्रथम विपिन ढाके, संतोष परदेशी, विशाल भागवत सोनवणे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


