महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या वेळापत्रकात बदल;२४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला;

मुंबई, दि. ४ ऑगस्ट : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता तारीख निश्चित करण्यात आली असून, सुधारित वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवून सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बूथ लेव्हल अधिकाऱ्यांकडून (BLO) घरोघरी भेटींचा कालावधी ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना १७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल.

प्रारूप मतदार यादीबाबत नागरिकांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येतील. दावे व हरकतींवरील सूचना, सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे.

सुधारित वेळापत्रकाची माहिती संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच उपलब्ध सर्व माध्यमांतून या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्यासह राजकीय पक्षांनाही सुधारित वेळापत्रकाची लेखी माहिती देण्यात येणार आहे.